ओडीपीसाठी नगरनियाेजन खात्याकडून ६० दिवसांची मुदत
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कळंगुट, हडफडे आणि वास्कोचे बाह्य विकास आराखडे (ओडीपी) नागरिकांना हरकती सादर करण्यासाठी खुले करण्यात आले आहेत. हरकती सादर करण्यासाठी ६० दिवसांची मुदत आहे. आधीच्या मसुद्यात केलेले बदल नगरनियोजन खात्याने अधिसूचित केले आहेत.
चार महिन्यांपूर्वी नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी ओडीपीचे मसुदे रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. ओडीपीत बरोच गोंधळ झाल्याचा आरोप नगरनियोजन मंत्र्यांनी केला होता. त्यामुळे मडगाव, फोंडा, पणजीसह सर्व ओडीपी त्यांनी रद्द केले होते. ओडीपीचा नवा मसुदा तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त केली होती.
कळंगुट - कांदोळी, हडफडे - नागवा - पर्रा तसेच वास्को ओडीपीचे मसुदे रद्द केले होते. आधीच्या चुका दुरुस्त करून नव्याने मसुदे तयार केले आहेत. हरकती दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर एका महिन्यात ओडीपी तयार होईल. तीन महिन्यांत सर्वच ओडीपी तयार होतील, असे नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले आहे.