जन्मदात्यांनीच केला चिमुकलीचा खून

सिरसईतील हृदयद्रावक घटना : संशयित आई-वडिलांना अटक

|
14th August 2022, 11:54 Hrs
जन्मदात्यांनीच केला चिमुकलीचा खून

प्रतिनिधी। गोवन वार्ता             

म्हापसा : दुसरीही मुलगीच झाल्याने जन्मदात्यांनीच आपल्या पाच महिन्यांच्या चिमुकलीचा लाटण्याने मारहाण करून बळी घेतला. कपेलवाडा सिरसई येथे रविवारी पहाटे ३.३०च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. जिया गोंडलेकर असे दुर्दैवी चिमुकलीचे नाव आहे. कोलवाळ पोलिसांनी आई - आर्मिंदा डोरा फर्नांडिस (३२) व वडील - सुदन अंकुश गोंडलेकर (४२) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ३.३०च्या सुमारास संशयित सुदन याने मृत चिमुकलीला बास्केटमध्ये घालून दुचाकीवरून कोलवाळ पोलीस स्थानकात आणले. पोलिसांनी त्वरित तिला म्हापशातील जिल्हा इस्पितळात दाखल केले. डॉक्टरांनी तिचा आधीच मृत्यू झाल्याचे जाहीर केले. संशयाची सुई आई-वडिलांवरच होती. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. दोघेही एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. दुपारी पोलिसांनी संशयितांविरुद्ध भा.दं.सं.च्या कलम ३०२ व गोवा बाल कायदा कलम ८ नुसार गुन्हा नोंद केला.             

संशयितांचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. संशयित सुदन पत्नीसह सिरसई येथे भाड्याच्या घरात राहत होता. त्यांना दोन वर्षांची मुलगीही आहे. पत्नीच्या मारहाणीला कंटाळून त्याने मुलीला आपल्या कुटुंबियांकडे ठेवले होते. काही महिन्यांपासून ती तेथेच आहे.

माहिती मिळताच निरीक्षक सोमनाथ माजिक, उपनिरीक्षक मंदार नाईक, सुशांत सांगोडकर, कुणाल नाईक व सोनम वेरेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सकाळी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना व उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी घटनास्थळाची पाहणी केली व आवश्यक सूचना केल्या. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. सोमवारी जियाचे शवविच्छेदन होणार आहे. त्यानंतरच खून कसा झाला हे समजणार आहे. पोलिसांनी मारहाणीसाठी वापरलेले लाटणे जप्त केले आहे. 

संशयित आर्मिंदा व सुदन यांना मादक पदार्थांचे व्यसन आहे. दुसरीही मुलगीच झाल्याने त्यांचे व्यसनाचे प्रमाण वाढले होते. नशेत रागाच्याभरात त्यांनी हे कृत्य केले असावे, असा संशय आहे.