कवळेकर, धारगळकर, फर्नांडिस, नारायण पागी यांना पदके जाहीर

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून घोषणा


14th August 2022, 11:52 pm
कवळेकर, धारगळकर, फर्नांडिस, नारायण पागी यांना पदके जाहीर

प्रतिनिधी । गोवन वार्ता                        

पणजी : पोलीस, अग्निशामक, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण विभाग मिळून गोव्यातील चार अधिकाऱ्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून विविध पदके जाहीर करण्यात आली आहेत. यात गोवा पोलीस सेवेचे पोलीस पदक (पीएम) वाहतूक विभागाचे निरीक्षक विजयनाथ कवळेकर, अग्निशामक दलाचे सब ऑफिसर प्रशांत धारगळकर यांना अग्निशामक पदक, गृहरक्षक कॅरोलिना फर्नांडिस यांना राष्ट्रपती गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदक जाहीर करण्यात आले आहे. गुणवत्तापूर्ण सेवेचे गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदक नारायण पागी यांना प्राप्त झाले आहे. या पदकांची घोषणा रविवारी करण्यात आली आहे.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलीस, अग्निशामक, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी पदक जाहीर करत असते. वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर १ एप्रिल १९९९ रोजी कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले होते. ९ सप्टेंबर २००६ रोजी त्यांची उपनिरीक्षकपदी थेट भरतीद्वारे  नियुक्ती झाली. १४ आॅगस्ट २०२० रोजी त्यांची निरीक्षकपदी बढती झाली. आता ते वाहतूक विभागात नोटीस पथकात निरीक्षकपदी कार्यरत आहेत. त्यांना विविध ठिकाणी गौरवण्यात आले आहे.

हेही वाचा