सोनिया गांधी यांना पुन्हा करोनाची लागण

प्रकृती स्थिर : सध्या आयसोलेशनमध्ये


14th August 2022, 12:15 am
सोनिया गांधी यांना पुन्हा करोनाची लागण

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा करोनाचा संसर्ग झाला आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार जयराम रमेश यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर असून त्यांना सध्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्या करोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करत असल्याचेही रमेश यांनी म्हटले आहे. सोनिया गांधी यांना जून महिन्यामध्येही करोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी त्यांनी सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) चौकशीला हजर राहण्यासाठी अधिक वेळ मागितला होता. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी सध्या ईडीकडून सोनिया यांची चौकशी सुरू आहे. त्यांना मागील वेळेस करोनाचा संसर्ग झाला होता तेव्हा करोनासंदर्भातील आरोग्य समस्यांमुळे दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.
मागील काही काळामध्ये काँग्रेसच्या अनेक नेत्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये पवन खेरा, खासदार अभिषेक मनू सिंघवी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा समावेश आहे. सोनिया गांधी यांची कन्या आणि काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी यांनाही याच आठवड्यात करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.