विचारांचा ताबा

Story: अनुभव | डॉ. रुपेश पाटकर |
13th August 2022, 11:24 pm
विचारांचा ताबा

सोमवार म्हणजे आमच्या बाजाराचा दिवस. त्यामुळे राईला शाळेतून घेऊन येताना माझी पत्नी सोबत आली होती. तिला आज बाजारात थोडा वेळ लागला. पाच वाजले आणि माझी मोबाईलची रिंग वाजली. 

"डॉक्टर, आम्ही पोचलो," तिकडून कोणी बाई बोलल्या आणि मला एकदम आठवण झाली की मी त्यांना पाच वाजता घरी बोलावलंय. खरं म्हणजे त्या चारपाच दिवसापूर्वी दुपारच्या वेळी आमच्या घरी आल्या होत्या. त्यांच्या यजमानांना बरे नव्हते, पण ते सोबत आले नव्हते. पेशंटला बघितल्याशिवाय औषध कसे देणार म्हणून मी त्यांना आज बोलावले होते. वेळ पाळू न शकल्यामुळे मलाच थोडे ओशाळल्यासारखे झाले. 

आम्ही घरी पोचलो तेव्हा त्या बाई पायरीवर बसल्या होत्या आणि एक केस पिकलेले सुमारे पन्नास पंचावनचे गृहस्थ उभे होते. 

गेटमधून माझी बाईक आत येताच ते म्हणू लागले, "यांना मी सांगत होतो की आता संध्याकाळी नको जाऊया. उद्या सकाळी जाऊया. पण हे ऐकले नाहीत. मला हे बघा मानेला नखे लावली." 

मी गाडीवरून उतरलो. मनात थोडा वैतागलो. कारण मी घरी लोकांना मदत म्हणून फावल्या वेळेत पेशन्ट पाहत असलो तरी माझ्या घरी क्लिनिकसारखा सेटअप नाही. त्यामुळे आता उत्तेजित पेशन्टना मी नोकरी करत असलेल्या हॉस्पिटलमध्ये बोलावतो किंवा पेशंटच्या नातेवाईकांना सोयीस्कर असलेल्या सायकीयॅट्रीस्टकडे पाठवतो. पण या बाई चार दिवसांपूर्वी भेटल्या तेव्हा पेशन्ट उत्तेजित असल्याचे म्हणाल्या नव्हत्या. 

मी बाईक पार्क केली. तोपर्यंत माझ्या पत्नीने कुलूप काढले. मी आत गेलो. आणि त्यांना आत बोलावले. तितक्या वेळेत माझ्या मनात पेशंटला सायकोसिस असावा, कदाचित मॅनिया किंवा पॅरानाॅइया असावा असे येऊन गेले. मी बोलावताच त्या बाई आत आल्या. त्यांच्या चेहर्‍यावर राग आणि हतबलतेचे भाव स्पष्ट दिसत होते. पण त्यांच्या यजमानांनी आत यायला थोडा वेळ घेतला. माझ्या समोरच्या सोफ्यावर त्या बसल्या. यजमान आत आले तरी उभे होते. 

"तुम्ही शांत व्हा. आधी बसा तरी," मी म्हणालो. पण ते बसले नाहीत. त्यांच्या पत्नी काही सांगू पहात होत्या, पण यजमानांना ते आवडणार नाही असे गृहीत धरून मी त्यांना म्हटले, "सांगा"

"खूप त्रास होतो हो. यांना वाटते मी मुद्दाम करतो. पण मी मुद्दाम करत नाही," त्यांना हुंदका आला. 

"रात्रभर झोपत नाहीत. व्यवस्थित जेवत नाहीत. आता येताना सुद्धा वाटेत यांचा चुलत भाऊ दिसला तर हे बाईक वरुन उतरायला लागले. त्यांना मी थांबवण्याच्या प्रयत्नात माझे नख मानेला लागले," त्या म्हणाल्या. 

"काय झाले? तुम्हाला ते भाऊ त्रास देतात का?"

"नाही. पण मला उगीचच असे वाटत रहाते. मी त्यांचा चेहरा बघितला की तोच परत परत डोळ्यासमोर येत राहतो. आणि वाईट काहीतरी घडेल असे वाटत रहाते," ते म्हणाले. 

"तुम्ही एकटे असताना तुम्हाला कुजबुज ऐकायला येते का?"

"नाही."

"दूर कोणी बोलतय असे आवाज ऐकायला येतात का?"

"नाही."

"कोणी विरोधी आहे, त्रास देतोय असे आहे का?"

"तसा काय नाय. आम्ही भायरचा बघला सगळा," त्यांची पत्नी म्हणाली. 

"नाही. कोणाचा त्रास नाही. मलाच असे वाटते," ते म्हणाले. 

"तुमच्या मनात कोणी विचार घालतेय. तुमचे विचार तुमचे नाहीत असे वाटते का?"

"मी मॅड नाही हो. मला सगळं समजतं," त्यांना पुन्हा हुंदका आला. 

आम्ही इतके बोलत असताना ते उभेच होते. 

मी त्यांना बसण्याची पुन्हा विनंती केली. त्यावर ते म्हणाले, "मी बसलो तर मला पुन्हा पुन्हा उठावे लागते. नाही उठलो तर माझ्या कुटुंबाचे वाईट होईल असे वाटत रहाते."

"असेच करतात. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून दुकानात सुद्धा गेले नाहीत. आमचे फळांचे दुकान आहे. गिर्‍हाईकाने फळे मागितली की चार वेळा फळांना हात लावणार आणि मागे सरणार. मग लोक काहीतरी म्हणतात. लोकांचे काय चूक. आपण आपले वागणे व्यवस्थित केले तर लोक कशाला काय म्हणतील," पत्नी म्हणाल्या. 

"मी मुद्दाम नाही हो करत. मला पण समजतं लोक हसणार ते. पण तसं नाही केलं तर काळजात खूप धडधड होते. वाईट घडणार असं वाटत राहतं.  पण ही मला बोलत राहतात. मी काय करू?" ते प्रचंड अगतिकतेने म्हणाले. 

"असं होऊ शकतं. हा एक आजार आहे. आपल्या डोक्यात आलेला विचार विचित्र आहे, त्यात अर्थ नाही हे माहीत असतं, पण काहीतरी कृती केल्याशिवाय शांत वाटत नाही," मी म्हणालो. 

माझ्या या शब्दांनी त्यांना धीर आला. ते म्हणाले, "परत एकदा सांगा."

मी पुन्हा सांगितले. 

"रागावू नका. परत एकदा सांगा. माझ्या मनात गेल्याशिवाय समाधान होत नाही," ते म्हणाले. 

मी पुन्हा सांगितले. 

मी त्यांना औषधे लिहून दिली. इतका सगळा वेळ ते उभेच होते. 

"आम्हालाही समजतं की मुद्दाम करत नाहीत. पुन्हा पुन्हा तेच विचारतात, मग आमचाही धीर सुटतो. दुकान हेच आमचे पोट. गेल्या दोन वर्षांपासून मी स्वतः त्यांच्यासोबत दुकानात थांबते. गेल्या दोन महिन्यांपासून हे घरातून बाहेरच पडलेले नाहीत. आणि प्रत्येक गोष्टीसाठी मीच लागते त्यांना घरात. दुकान आणि यांना सांभाळताना नाकीनऊ येतात. पेटीभर डाळिंबे मला विकता न आल्याने खराब झाली," त्या म्हणाल्या. 

त्या प्रिस्क्रीप्शन घेऊन जाण्यासाठी उठल्या. पण त्यांच्या यजमानांनी उंबरठ्यापलिकडे पाउल टाकले आणि ते पुन्हा आत आले. पुन्हा त्यांनी पलीकडे पाउल टाकले आणि पुन्हा आत आले. त्यांनी तसे पाचवेळा केले आणि सहाव्या वेळेला ते आत आले आणि त्यांनी बाहेर उडी टाकली. तो सगळा प्रकार त्यांच्या पत्नीला लाजिरवाणा वाटत होता. 

त्यांनी स्वतःच्या विचारांना नियंत्रित करण्याची क्षमता गमावली होती.

आपण काही गृहितकांवर आधारित तर्कनिष्ठ विचार करत असतो. त्या तर्काला न जुळणारे किंवा त्याला विरोधी जाणारे विचार आपण झटकून टाकत असतो. आपल्या विचारांना सभोवतालची परिस्थिती आकार देत असली, तरी ते आपल्या नियंत्रणात वाटतात किंवा परिस्थितीला अनुरूप वाटतात. पण आपली ही विचार सेंसाॅर करण्याची क्षमताच गेली तर... विचार मूर्खपणाचे आहेत, हे मनाला स्पष्टपणे माहीत असताना देखील त्यांनी आपल्यावर नियंत्रण मिळवले तर... त्या विचाराप्रमाणे कृती करण्याची सक्ती केली तर...? हेच त्यांच्या वाट्याला आले होते. 

"जसा एखाद्याचा मुलगा चांगले संस्कार करून देखील उधळा निपजतो आणि बापाला असहाय्यपणे त्याची उधळपट्टी पहावी लागते, तसे माझे झालेय. माझे मन माझ्या हातातून निसटले आहे. त्याचा वेडेपणा मला दिसतो आहे, पण माझे काहीच चालत नाही, मी त्याच्यामागे फरफटत जातोय," दुसर्‍या एका पेशन्टने मला सांगितले होते. 

"एखाद्या टेंशनमुळे किंवा दुसर्‍याने अपशब्द बोलल्यामुळे किंवा हार पत्करावी लागल्यामुळे येणारे विचार वेगळे. तिथे विचार पुन्हा पुन्हा यायला काही कारण असते. पण माझ्या विचारांना काहीच कारण नाही. असहाय्यतेचा प्रचंड त्रास होतो डॉक्टर. माझा त्रास दुसर्‍याला समजणार नाही," आणखी एका पेशंटने मला सांगितले होते. त्याला देवाची मूर्ती बघितली की शिव्या पुटपुटायची सक्ती होई. लहानपणापासून देवभक्त असलेला हा माणूस त्यामुळे देवघरात जाणे टाळत असे. त्याची घुसमट त्याला कोणाकडे व्यक्तदेखील करता येत नसे. 

असा त्रास होत असलेल्या व्यक्तीच्या मेंदूच्या रसायनांमध्ये विशेषतः सेरेटोनिन या द्रावामध्ये फरक झालेला असतो. विचार करण्याशी संबंधित मेंदूच्या भागातील चेतापेशीमधील रसायन कमी झालेले असते. त्यामुळे ते वाढवणारे औषध त्यांना द्यावे लागते. 

या आजाराला ऑबसेसिव्ह कंपलसिव डिसऑर्डर म्हणतात. एखादा विचित्र विचार मनात पुन्हा पुन्हा येत राहण्याला इंग्रजीत ऑबसेसिव विचार म्हणतात. त्या विचारावर मात करण्यासाठी काहीतरी कृती करण्याची सक्ती पेशंटला वाटते. इंग्रजीत त्याला कंपलसिव वर्तन म्हणतात. औषधोपचारानी बर्‍यापैकी नियंत्रणात रहाणारा हा आजार आहे.