आटोपशीरपणा एक चांगली सवय

आटोपशीरपणा एक चांगली सवय आहे. स्वत:प्रमाणे आपले घरही आटोपशीर असावे. त्यासाठी उपलब्ध सामान योग्य ठिकाणी ठेवून देण्यासह जुन्या सामानांची वेगळी विल्हेवाट लावण्याचीही गरज आहे. सामानांची व्यवस्थित मांडणी घराची शोभा वाढवते. शिवाय आटोपशीरपणामध्ये भर टाकते.

Story: घराबद्दल बरेच काही | गौरी भालचंद्र |
13th August 2022, 05:38 Hrs
आटोपशीरपणा एक चांगली सवय

टाॅनिकच्या बाटल्या, औषधांच्या बाटल्या, खोकी, लहान-मोठे टिनचे डबे, कागदाच्या पिशव्या, जुने जीर्ण कपडे, उदा. डबा चांगला आहे. झाकण मोडके आहे. कधीतरी उपयोग होईल, म्हणून अशा वस्तू घरात साठवतात. त्यांच्यामुळे घाण वाढतच जाते. कित्येक वेळा काही डबे, बाटल्या पडून राहिलेल्या असतात. अनेक महिने उघडून पाहिलेले नसते. त्यामुळे त्यातील वस्तू वाया जातात. 

खेड्यापाड्यामध्ये अनेक गोष्टी साठवून ठेवाव्या लागतात. वरचेवर उपलब्ध होत नसल्याने काही वस्तूंचा साठा करणे अपरिहार्य असते. शहरांमध्ये जवळपासच्या दुकानांमध्ये हवा तो माल मिळतो. म्हणून आपल्या आटोक्याबाहेर जाईल एवढे सामान घरात जमवू नये. साधारण तारतम्याने अनावश्यक वाटणा-या गोष्टी वेळच्यावेळी घरातून काढून टाकाव्या.

वस्तू घेताना चांगली दिसली तरी ती तशीच दिसावी किंवा राहावी म्हणून नंतर कितपत काळजी घ्यावी लागते, याचा विचार खरेदीच्या वेळीच करणे आवश्यक आहे. शक्यतो, स्वच्छ ठेवण्यास सोप्या साधनांची निवड करावी. उदा. पितळी बादल्या, घंगाळ, पाण्याची भांडी, डबेही अवजड असतात. तसेच लवकर डागाळतात. त्याऐवजी शक्य असेल तेथे स्टील, अ‍ॅल्युमिनियम, प्लास्टिक यांचा वापर करावा. 

साध्या साबणाने किंवा पावडरने घासून ही भांडी स्वच्छ राहतात. लवकर डागाळत नाहीत. त्यामुळे स्वच्छता ठेवणे सोपे जाते. याशिवाय घरातील लाकडी फळय़ांना शक्यतो ऑईलपेंट लावावा. त्यामुळे फळय़ा स्वच्छ ठेवणे सोपे जाते. फळय़ा सलग असाव्या म्हणजे झुरळे होत नाहीत. जोडलेल्या असल्यास, त्यात लांबी भरून झुरळे न होण्याची काळजी घ्यावी. भिंतीमधील कपाटामध्ये विशेषत: स्वयंपाकघरात कडाप्पा बसवावा. त्यामुळे कपाटे धुऊन स्वच्छ ठेवणे सोपे जाते.

टेबल, कपाटांचे दर्शनी भाग, रेडिओ, टीव्ही यांच्या केसेस यांना सनमायका लावावा. ते शक्य नसेल, तर रेक्झीन किंवा प्लास्टिकचे आच्छादन घालावे किंवा कापडी आच्छादने घालावी. ओटा, खोलीतील फरशा, मोरी यांना योग्य उतार असावा. त्यामुळे धुण्याचे काम सोपे होते व स्वच्छता ठेवणे सोईचे जाते. सर्वच खोल्यामध्ये भिंतीच्या तळाशी, जमिनीलगत फरशी बसवून घ्यावी. स्वयंपाकघरात याची उंची थोडी अधिक असावी. कारण, ती फरशी जास्तीत जास्त वेळा पुसावी लागते. ही काळजी घेतल्यामुळे भिंतीवर धुण्याच्या पाण्याचे डाग पडत नाहीत व भिंती स्वच्छ राहण्यास मदत होते.

मांडणीचा विचार घरबांधणीपासूनच करायला हवा. म्हणजे एकमेकांशी संबंधित असलेल्या कृतींची जागा घर बांधतानाच योग्य आणखी करून जवळजवळ ठेवायला हवी. उदा. स्वयंपाकघर, फ्रीजची जागा आणि धुणे धुण्याची जागा आणि धुणे वाळत घालण्याची जागा ही शक्य तेवढी जवळजवळ हवी म्हणजे अधिक ये-जा करावी लागत नाही आणि काम अधिक तत्परतेने होते. एखाद्या कृतीसाठी संबंधित सामान जवळजवळ हवे. यामुळे काम सोपे होते व वस्तू जागच्या जागी राहण्यास मदत होते. 

उदा. इस्त्री ठेवायची जागा, इस्त्री करायची जागा, इस्त्री करायचे कपडे, कपडे ठेवायचे कपाट हे जवळजवळ हवे. काम करायची जागा आणि वस्तू ठेवायची जागा लांब असल्यास, तसेच वस्तू अवजड असल्यास त्या जागच्या जागी ठेवणे तत्परतेने होत नाही. यामुळे पसारा वाढतो. म्हणूनच प्रत्येक वस्तूला सोयीस्कर जागा हवी आणि काम झाल्यावर वस्तू जागेवरच ठेवायला हवी.

स्वच्छतेइतकेच टापटिपीला आणि व्यवस्थितपणाला महत्त्व आहे. सामान ठेवायची जागाही सोयीची हवी. वरचेवर लागणारे सामान सहज हात पोहोचेल, अशा उंचीवर हवे. हात नीट मागे पोहोचत नाही, एवढी खोल कपाटे किंवा ओटय़ाच्या बाजूला उभे राहिल्यावर थोडेसे डाव्या- उजव्या बाजूला होऊन दोन्ही हाताच्या टप्प्यात येतील अशा पद्धतीने वस्तू मांडाव्यात. डबा, किचन टेबल, ताटाळे, कपबशांचे स्टँड अशा साधनांमुळे आवश्यक वस्तू एकत्रित मिळणे सोपे जाते. अशा तऱ्हेची विविध साधने बाजारात मिळतात. त्यांचा सोयीप्रमाणे वापर करावा. अशा तऱ्हेने सुटसुटीत मोजक्याच साहित्याची योग्य मांडणी केल्यावर स्वच्छता ठेवणे, टापटीप व व्यवस्थिपणा राखणे सोपे जाते व घर सुंदर दिसते. सर्वाची घरे साचेबंद दिसली तरी घराच्या मांडणीमध्ये आपला ठसा दिसणे अपरिहार्य आहे. त्यामुळेच वास्तूबद्दल आपलेपणा वाटतो. प्रत्येक कुटुंबाच्या गरजा, व्यक्तीच्या सवयी, आवडी-निवडी आणि सुखाविषयीच्या कल्पना भिन्न असतात. त्यांची पूर्तता झाली, तरच घरात समाधान व आनंद मिळेल.