१४ महिन्यांच्या मुलीचा खून करुन आईचा आत्महत्येचा प्रयत्न

चिखलीतील घटनेने खळबळ

|
06th August 2022, 01:38 Hrs
१४ महिन्यांच्या मुलीचा खून करुन आईचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रतिनिधी । गोवन वार्ता 

वास्को : चिखली जंक्शन याठिकाणी राहणार्‍या महिलेने आपल्याच १४  महिन्यांच्या बालिकेचा खून करुन जुवारी नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर महिलेला वाचवण्यात आले असून सध्या तिला गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर वास्को पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, चिखली जंक्शनजवळ राहत असलेल्या व तीन महिन्यांपूर्वीच जर्मनीतून परतलेल्या या महिलेने जुवारी नदीत आत्महत्येच्या हेतूने उडी घेतली. पूल कर्मचाऱ्यांनी तिला वाचवले. यानंतरच्या तपासात या महिलेची १४ महिन्याची मुलगी घरी मृत अवस्थेत सापडल्यामुळे खळबळ उडाली. आगशी पोलिसांनी महिलेला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमिषा (निंभी) वाल्सन असे या महिलेचे नाव आहे. तिच्या वडिलांनी सांगितले, निमिषा ही मानसिक तणावाखाली होती होती व त्यातूनच तिने आपल्या मुलीचा खून केला व त्यानंतर हाताची शीर कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. तो यशस्वी न झाल्याने तिने गाडीची चावी घेत शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घर सोडले. गाडी घेऊन ती जुवारी पुलानजिक आली. त्याठिकाणी गाडी पार्क केली व जुवारी पुलावरुन तिने पाण्यात उडी मारली. सध्या जुवारी पुलावर काम सुरू असल्याने त्याठिकाणी उपस्थित कामगारांनी  तत्काळ तिला पाण्याबाहेर काढले व आगशी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी लगेच  घटनास्थळी धाव घेतली. तिला बांबोळी येथे गोमेकॉमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.निमिषा वाल्सन व त्यांचे पती कामानिमित्ताने जर्मनी येथे वास्तवास होते. निमिषा तीन महिन्यांपूर्वी मायदेशी परतल्या. सध्या त्या वडिलांच्या घरात राहत होत्या. मात्र मुलीचा खून करुन आत्महत्या करण्याचा निर्णय निमिषा यांनी का घेतला याचा तपास वास्को पोलीस करत आहेत. निमिषा यांच्यावर उपचार सुरू असून वास्को पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.