सुमारे दहा मेट्रिक टन साखरही ‘विरघळली’!

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
05th August 2022, 11:34 Hrs
सुमारे दहा मेट्रिक टन साखरही ‘विरघळली’!

पणजी : खराब तूरडाळीचा विषय राज्यभरात गाजत असतानाच आता राज्यातील अकराही गोदामांत पडून असलेली १० मेट्रिक टन साखरही विरघळल्याचे समोर आले आहे. या साखरेची विल्हेवाट लावण्यासाठी नागरी पुरवठा खात्याने २८ जुलै रोजी जाहिरात प्रसिद्ध करून निविदा मागवल्या आहेत.
विरघळलेली साखर घेण्यासाठी इच्छुकांनी १८ ऑगस्ट २०२२ पर्यंत निविदा सादर कराव्यात. त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता त्या निविदा उघडण्यात येतील, असे जाहिरातीत म्हटले आहे. ही साखरही कोविड काळातच इतर राज्यांतून आणली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, कोविड काळात राज्यात सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले होते. अशा परिस्थितीत नागरी पुरवठा खात्याच्या दुर्लक्षामुळे १० मेट्रिक टन गोदामांत पडून राहिली. त्या काळातील साखरेचा दर विचारात घेतल्यास विरघळलेल्या साखरेची किंमत ५ लाखांवर जाते. ही साखर कमी दराने स्वस्त धान्य दुकानांमार्फत जनतेपर्यंत पोहोचवणे सहज शक्य होते. परंतु, सरकार आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे लाखोंची साखर वाया गेल्याचेही सूत्रांनी सांगितले.