फोंडा शहरात अनेक दुकानांत शिरले पाणी

|
23rd June 2022, 11:42 Hrs
फोंडा शहरात अनेक दुकानांत शिरले पाणी

फोंडा येथील ढवळीकर पेट्रोल पंपसमोरील रस्त्यावर भरलेल्या पाण्यातून जाणारी वाहने.   प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा :
फोंडा येथील जुन्या बसस्थानकाजवळ असलेल्या ढवळीकर पेट्रोल पंपसमोरील रस्ता गुरुवारी सायं. ६.३० च्या सुमारास पाण्याखाली गेला. तर पोलीस स्थानकांमध्ये असलेल्या अनेक दुकानांत पाणी शिरले. यात पब्लिक कॅफे हॉटेलमध्ये अधिक प्रमाणात पाणी शिरल्याने मालकाचे नुकसान झाले.
फोंड्यात दरवर्षीप्रमाणे पहिल्याच मुसळधार पावसात जुन्या बस स्थानकाजवळ रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे सर्व वाहने पाण्यातून हळूवार मार्गक्रमण करत होती. संध्याकाळची वेळ असल्याने कामावरून सुटलेल्या लोकांची बसस्थानकावर गर्दी होती. त्यात रस्त्यावर पाणी भरल्याने अनेक पादचाऱ्यांना पाण्यातून रस्ता ओलांडावा लागला.
फोंडा पोलीस स्थानकामागे असलेल्या पब्लिक कॅफेमध्ये सर्व प्रथम पाणी शिरले. त्यामुळे आजुबाजूच्या दुकानदारांची तारांबळ उडाली. दुकानात पाणी शिरण्याची शक्यता असल्याने दुकानांतील साहित्य वर काढण्यात कामगारांची धावपळ उडाली. तिस्क-फोंडा येथेही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी दिसून आले. दरम्यान, खांडेपार येथील डॉमनिक यांच्या मालकीच्या घरावर झाड कोसळले. यात डॉमनिक यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. माहिती मिळाल्यानंतर फोंडा अग्निशमनच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.