मोदींच्या मातोश्रींचे १००व्या वर्षात पदार्पण

पंतप्रधानांनी केली पाद्यपूजा, घेतले आशीर्वाद


19th June 2022, 12:32 am
मोदींच्या मातोश्रींचे १००व्या वर्षात पदार्पण

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन यांनी शनिवारी १००व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी अहमदाबादला पोहोचले. त्यांनी त्यांच्या आईचे पाद्यपूजन केले. नंतर आईचे आशीर्वादही घेतले. आईनेही वाढदिवसानिमित्त भेटायला आलेल्या मुलाचे तोंड गोड केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिटनेसची देशभरात चर्चा आहे. खरे तर फिटनेस ही मोदी कुटुंबाची परंपरा आहे. त्यांची आई हिराबेन यांच्या आरोग्याचीही नेहमी चर्चा होते. पंतप्रधानांचे भाऊ प्रल्हाद मोदी याविषयी म्हणाले, हिराबांच्या मेहनतीबरोबरच त्यांच्या सकारात्मक विचारांनी त्यांना या वयातही फिट ठेवले आहे. त्यांनी याआधी कोणत्या औषधी घेतल्या नाही आणि आताही घेत नाहीत. कोणत्याही समस्येवर त्या घरगुती उपचार करतात. मेहनत आणि साधे जीवन यामुळे आजही त्यांचे आरोग्य आम्हा मुलांपेक्षा चांगले आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत स्वतःचे सर्व काम त्या स्वतः करतात. नेहमीच त्या साधे जीवन जगतात. आईचा स्वभाव धार्मिक आहे आणि आजही त्यांच्या दररोजच्या नियमांमध्ये पूजापाठ सर्वात वर आहे.