आदल्या दिवशी लग्नात घातलेल्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

फोंड्यात फ्लॅट फोडून १० लाखांचे सुवर्णालंकार लंपास

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th May 2022, 01:20 Hrs

कुर्टी येथील चोरी झालेल्या इमारतीजवळ उभे असलेले ठसे तज्ज्ञांचे वाहन.

फोंडा : आदल्या दिवशी लग्नसमारंभात घालून गेलेले महिलेचे दागिने दुसऱ्या दिवशी चोरट्यांनी फ्लॅट फोडून लंपास केल्याने येथील नागरिक अचंबित झाले आहेत. हाऊसिंग बोर्ड-कुर्टी येथील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नरसिंह नाईक यांचा फ्लॅट सोमवारी सकाळी १० ते १२ वाजण्याच्या सुमारास फोडून चोरट्यांनी अंदाजे १० लाख रुपयांचे दागिने लंपास केले. या दागिन्यात नरसिंह नाईक यांच्या पत्नीबरोबर त्यांच्या सासूच्या दागिन्यांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सकाळी नरसिंह नाईक यांची पत्नी व दोन्ही मुले कामासाठी गेली होती. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नरसिंह काही कामासाठी कुर्टी पंचायतीच्या कार्यालयात गेले होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते फ्लॅटमध्ये परतल्यानंतर मुख्य दरवाजा खुला असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर फ्लॅटमध्ये जाऊन कपाटाची तपासणी केली असता सोन्याचे दागिने लंपास झाल्याचे आढळून आले.
सावर्डे येथे राहणाऱ्या सासूच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने सासूने आपले सर्व दागिने आपल्या मुलीकडे ठेवण्यासाठी दिले होते. त्यामुळे चोरी झालेल्या दागिन्यांत सासूच्या दागिन्यांचाही समावेश आहे. रविवारी नरसिंह यांची पत्नी दागिने घालून एका लग्न समारंभाला गेली होती. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नरसिंह यांच्या फ्लॅट समोरील अन्य एका व्यक्तीचा फ्लॅट सोमवारी बंद होता. परंतु चोरट्यांनी थेट नरसिंह यांच्याच फ्लॅटमध्ये जाऊन चोरी केल्याने स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
चोरीची माहिती मिळाल्यावर फोंडा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक नितेश काणकोणकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर संध्याकाळी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत फोंडा पोलीस, ठसे तज्ज्ञ व श्वान पथकांनी फ्लॅटच्या परिसरात चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. दरम्यान, दिवसाढवळ्या झालेल्या या प्रकारामुळे सर्वजण अचंबित झाले.