* मंकीपॉक्स प्रभावित देशातून
येणाऱ्यांना क्वारंटाईन करणार
* संशयित व्यक्तींचे सॅम्पल्स
तपासणीसाठी जातात पुण्यात
* काही कालावधीने आपोआप
बरा होतो; मात्र प्रसंगी धोका शक्य
मुंबई : करोना महामारीशी दोन हात केल्यानंतर जग आता नव्या आजाराच्या विळख्यात सापडत आहे. हा आजार गेल्या १५ दिवसांत १५ देशांत पसरला आहे. सोमवारी बेल्जियमनंतर आता इंग्लंडमध्येही मंकीपॉक्स झालेल्या रुग्णांना २१ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा २१ दिवसांचा कालावधी बंधनकारक करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही हा आजार गांभिर्याने घेतला आहे. कोणत्याही देशात या आजाराचा एकही रुग्ण सापडला तरी तो उद्रेक मानण्यात येणार आहे. दुसरीकडे भारतातही मंकीपॉक्सचा आजार गतीने पसरत चालल्याचे दिसते आहे. मुंबई महापालिकेनेही याची पूर्वतयारी करत कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये २८ बेड्सचा आयसोलेशन वॉर्ड तयार केला आहे.
आत्तापर्यंत इंग्लंड, अमेरिका, इटली, स्वीडन, फ्रान्स, पोर्तुगाल, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, बेल्जियम, नेदरलँड, इस्रायल, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण सापडले आहेत. गेल्या २ आठवड्यांत या रुग्णांची संख्या १००च्या पार पोहोचली आहे. सुदैवाने या आजाराने अद्यापपर्यंत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
केंद्र सरकारही
अॅक्शन मोडमध्ये
केंद्र सरकारच्या पातळीवरही मंकीपॉक्सबाबत टेन्शन वाढले आहे. गतीने होत असलेल्या संक्रमणाच्या काळात ‘आयसीएमआर’ला अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंकीपॉक्स प्रभावित देशातून येणाऱ्या आजारी प्रवाशांना तातडीने क्वारंटाईन करा, असे आदेश विमानतळ आणि बंदरांवर देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने हे आदेश जारी केले आहेत. या आजारी व्यक्तींचे सॅम्पल्स हे पुण्यात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीला पाठवण्यास सांगण्यात आले आहे.
गर्भवती महिला,
मुलांना जास्त धोका
मंकीपॉक्ससारख्या दुर्मीळ आजाराचे संक्रमण झाल्यास हा आजार काही कालावधीने आपोआप बरा होतो. मात्र, काही जणांसाठी हा गंभीर होण्याची भीती असल्याचे जागितक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. यात लहान मुले, गर्भवती महिला आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्यांचा समावेश आहे. ५ वर्षांखालील मुलांना याचे संक्रमण लगेच होण्याची शक्यता आहे.
मंकीपॉक्सचा कसा होतो फैलाव?
* मंकीपॉक्स हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे. जे १९५८ साली कैदेत असलेल्या एका माकडाला झालेले आढळून आले होते.
* १९७० साली या आजाराचे संक्रमण माणसांनाही होत असल्याचे समोर आले.
* मंकीपॉक्सचे संक्रमण हे डोळे, नाक आणि तोंडाच्या माध्यमातून पसरते.
* रुग्णाचे कपडे, भांडी आणि पांघरुणाला स्पर्श केला तरी हा आजार पसरण्याची शक्यता आहे.
* तसेच माकडे, उंदीर अशा जनावरांना मारल्याने किंवा त्यांच्या रक्ताच्या संपर्कात आल्यास मंकीपॉक्स होण्याची शक्यता असते.


