कुर्टी पंचायत क्षेत्रात रस्त्यानजीक कचरा टाकण्याचे प्रकार वाढले

कॅमेरे बसवून संबंधितांविरोधात कारवाई करा : ग्रामस्थ


23rd May 2022, 12:03 am
कुर्टी पंचायत क्षेत्रात रस्त्यानजीक कचरा टाकण्याचे प्रकार वाढले

कुर्टी पंचायतीच्या ग्रामसभेत चर्चा करताना नागरिक.         

प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा :
कुर्टी पंचायत क्षेत्रात रस्त्याच्या बाजूला आणि नाल्यात अज्ञातांकडून कचरा टाकण्याचा प्रकार घडत असून, परिसरात सीसी कॅमेरे बसविणे तसेच कचरा टाकणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचा महत्त्वाचा ठराव रविवारी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे. दरम्यान, प्रत्येक ग्रामसभेला सर्व पंच सदस्यांनी उपस्थित राहण्याचा निर्णयही यावेळी ग्रामस्थांनी घेतला.
सरपंच दादी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत पंच रुक्मा खांडेपारकर, सुधीर राऊत, सांतान फर्नांडिस, भिका केरकर, गुरुदास खेडेकर व सचिव रूपेश हळर्णकर उपस्थित होते. कुर्टी-खांडेपार पंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूला कचरा टाकण्यात येत आहे. अधिकतर बांधकामाचा कचरा टाकण्यात येत असल्याने स्थानिकांना कचऱ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कचरा टाकण्यात येणाऱ्या विविध जागांवर सीसी कॅमेरे बसविण्याची अत्यंत गरज आहे. यापूर्वी ग्रामस्थांनी कचरा टाकणाऱ्यांना रंगेहाथ पकडून दिले आहे. परंतु, पंचायतीतर्फे कारवाई करण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांनी लक्षात आणून दिले. भविष्यात कचरा टाकणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.
कुर्टी पंचायत क्षेत्रात असलेल्या एका शिक्षण संस्थेकडून स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे पालकांची निराशा होत असल्याने पंचायतीतर्फे शिक्षण खात्याकडे तक्रार करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान, ग्रामसभेत पंच सदस्य उपस्थित राहत नसल्याने अनेक प्रश्नाची उत्तरे ग्रामस्थांना मिळत नाही. त्यामुळे भविष्यात प्रत्येक ग्रामसभेत पंच सदस्यांनी उपस्थित राहण्याचा ठराव घेण्यात आला आहे.