उबेर चषक बॅडमिंटन : सिंधूकडूनही निराशा
पी. व्ही. सिंधू
बँकॉक : थॉमस चषकासोबतच येथे सुरू असलेल्या उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत आधीच उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित करणाऱ्या भारतीय महिला संघाला बुधवारी ड गटातील आपल्या अखेरच्या सामन्यात कोरियाकडून ०-५ ने पराभव पत्करावा लागला. कॅनडा व अमेरिकेविरुद्ध लागोपाठ दोन विजय मिळविल्यानंतर भारतीय महिला संघाच्या ताकदीची परीक्षा झाली. कोरियाविरुद्धच्या पाच सामन्यांदरम्यान भारताला एकही सामना जिंकता आला नाही. तथापि, या पराभवाची फारशी गणना होणार नाही, कारण भारताने दोन विजयानंतर गटात अव्वल दोन क्रमांकात स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.
दोन वेळा ऑलिम्पिकपदक जिंकणाऱ्या पी. व्ही. सिंधूसाठी आजचा दिवस निराशाजनक ठरला. तिला चौथ्या विश्वमानांकित अॅन सेयुंगकडून सलग पाचव्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळी एकतर्फी लढतीत सिंधूला १५-२१, १४-२१ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारत लवकरच ०-१ ने पिछाडीवर गेला.तनिषा-जॉली जोडीचाही पराभव
पुढील दोन लढतींमध्ये किम हे जेओंग व कोंग हेयॉन्ग या जोडीने तनिषा क्रस्टो-ट्रीसा जॉली या जोडीचा २१-१४, २१-११ असा पराभव केला, तर अस्मिता चालिहाला सिम युजिनकडून १८-२१, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला. याबरोबरच कोरियाने भारताचा सरळ ५-० असा पराभव केला. थॉमस चषक स्पर्धेतील क गटात भारतीय पुरुष संघाचा सामना चीन तैपेईशी होणार आहे.
श्रुती-सिंघी जोडी ठरली असमर्थ
श्रुती मिश्रा आणि सिमरन सिंघी ही जोडी ली सोही आणि शिन सेंगचन या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाच्या जोडीविरुद्ध चिवट झुंज देण्यास असमर्थ ठरली व भारतीय जोडीला ३९ मिनिटांत १३-२१, १२-२१ असा पराभव पत्करावा लागला. नंतर आकर्षी कश्यपही जागतिक क्रमवारीत १९व्या स्थानावर असलेल्या किम गा युनकडून १०-२१, १०-२१ ने पराभूत झाल्यामुळे भारतीय संघ ०-३ ने पिछाडीवर गेला.