कोलवाळमध्ये वाहन चोरट्यास साडे सहा लाखांच्या मुद्देमालासह अटक


31st January 2022, 12:00 am
कोलवाळमध्ये वाहन चोरट्यास साडे सहा लाखांच्या मुद्देमालासह अटक

कोलवाळ पोलिसांनी अटक केलेल्या संशयित जितेंद्र तोरस्कर व जप्त केलेल्या वाहनांसोबत पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक व सहकारी पोलीस.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : कोलवाळ पोलिसांनी दुचाकी चोरीच्या संशयावरून संशयित जितेंद्र शंकर तोरस्कर (४०, पाळणीवाडा, थिवी) यास अटक केली. संशयितांकडून दोन कार गाड्या, पाच दुचाकी, सात दुचाकींचे इंजिन आणि दोन पेट्रोल टँक मिळून साडे सहा लाखांच्या वस्तू जप्त केल्या.
फिर्यादी विनायक कदम (रा. पणजी, मूळ कोल्हापूर) यांनी शनिवारी आपली एमएच ०९ एफई २९३८ ही यमाहा एफझी दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार कोलवाळ पोलिसांत दिली होती. हल्लीच्या काळात पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात अनेक वाहने चोरीस जाण्याच्या घटना घडल्या होत्या.
या चोरीच्या घटनेचा तपास केला असता पोलिसांच्या हाती संशयित जितेंद्र तोरस्कर हा लागला. संशयिताकडून पोलिसांनी चोरीची यमाहा एफझी दुचाकी जप्त केली. यावेळी संशयिताजवळ अजून चोरलेली वाहने आणि वाहनांचे सुटे भाग सापडले.
संशयिताकडे बनावट क्रमांकपट्टी असलेली एक नॅनो कार, एक ओमनी कार, तीन हिरो होंडा दुचाकी, एक अ‍ॅक्टिव्हा स्कुटर, सात विविध दुचाकींचे इंजिन पार्ट आणि दोन दुचाकींचे पेट्रोल टँक सापडले. या सर्व मालाची किंमत सुमारे ६ लाख ५० हजार रुपये असून तो पोलिसांनी जप्त केला. नॅनो कार चोरीची तक्रार म्हापसा पोलिसांत नोंद असून गेल्या डिसेंबरमध्ये थिवीमधून ही कार चोरीला गेली होती. इतर वाहनांच्या चोरीचा तपशील पोलीस घेत आहेत.
पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना व उपअधीक्षक उदय परब यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सोमनाथ माजिक, उपनिरीक्षक मंदार परब, सहाय्यक उपनिरीक्षक रोहिदास नाईक, हवालदार रामा नाईक, कॉन्स्टेबल सुदेश नाईक, साजो देसाई या पथकाने ही कारवाई केली.
संशयित चोरटा निर्जनस्थळी असलेल्या गाड्या चोरत असे. आपल्या थिवी येथील शांतादुर्गा गॅरेजमध्ये नेऊन चोरटा तिथे वाहने मॉडीफाय करायचा. तसेच वाहनांना बनावट क्रमांकपट्टी लावायचा. ही त्याची चोरी करण्याची शक्कल होती.

हेही वाचा