दीपक, पालयेकरांकडून आमदारकीचा राजीनामा

दोघांकडूनही अपक्ष लढण्याचा निर्णय; विधानसभेतील आमदार संख्या २५

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
22nd January 2022, 12:39 am
दीपक, पालयेकरांकडून आमदारकीचा राजीनामा

पणजी : भाजपने उमेदवारी डावलल्यामुळे मंत्री तथा सावर्डेचे आमदार दीपक प्रभु पाऊस्कर यांनी, तर काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीमुळे उमेदवारी हुकल्याने शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांनी शुक्रवारी आमदारकीचे राजीनामे दिले. त्यामुळे चाळीस सदस्यीय विधानसभेतील आमदारांची संख्या २५ झाली आहे.
२०१९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीनंतर काहीच दिवसांत भाजपने काँग्रेस आणि मगोपला सुरूंग लावला. काँग्रेसचे दहा आणि मगोपचे दोन असे बारा आमदार फोडून राज्यात स्पष्ट बहुमताचे सरकार स्थापन केले. भाजपने फोडलेल्या आमदारांमध्ये मगोपच्या दीपक प्रभु पाऊस्कर यांचाही समावेश होता. पक्षात घेताच भाजपने दीपक प्रभु पाऊस्कर यांची सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्रिपदी वर्णी लावली. परंतु, विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देताना पक्षनिष्ठा आणि भाजप विचारधारा या मुद्द्यांना प्राधान्य देत सावर्डेत गणेश गावकर यांना उमेदवारी देत पाऊस्कर यांना वगळले. पक्षाच्या या निर्णयामुळे निराश झालेल्या पाऊस्कर यांनी शुक्रवारी राजीनामा देत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे.
दरम्यान, २०१७ मध्ये गोवा फॉरवर्डच्या उमेदवारीवर शिवोलीतून निवडून आलेल्या विनोद पालयेकर यांची फॉरवर्डने भाजपला सत्तास्थापनेत मदत केल्याने जलस्रोत खात्याच्या मंत्रिपदी वर्णी लागली. परंतु, पोटनिवडणुकीनंतर भाजपने गोवा फॉरवर्डला सत्तेबाहेर काढल्याने पालयेकरांचे मंत्रिपद गेले होते. त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार, अशा चर्चा अनेकवेळा रंगल्या. परंतु, पालयेकर यांनी गोवा फॉरवर्डमध्येच राहणे पसंत केले होते. विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्डची उमेदवारी आपल्याला मिळेल असे त्यांना वाटत होते. परंतु, गोवा फॉरवर्डने काँग्रेससोबत युती केल्याने आणि ही जागा काँग्रेसला गेल्याने पालयेकर यांना उमेदवारीपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी राजीनामा देत अपक्ष म्हणून शिवोलीतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

आतापर्यंत या आमदारांनी दिला राजीनामा

लुईझिन फालेरो
रवी नाईक
आलेक्स रेजिनाल्ड
गोविंद गावडे
रोहन खंवटे
प्रसाद गावकर
जयेश साळगावकर
मायकल लोबो
प्रवीण झांट्ये
कार्लुस आल्मेदा
एलिना साल्ढाणा
विल्फ्रेड डिसा
इजिदोर फर्नांडिस
दीपक प्रभु पाऊस्कर
विनोद पालयेकर

हेही वाचा