आतापर्यंत सुमारे २.४४ कोटींचा मुद्देमाल जप्त

आचारसंहिता काळातील आकडेवारी : कुणाल यांची पत्रकार परिषद

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
22nd January 2022, 12:32 am
आतापर्यंत सुमारे २.४४ कोटींचा मुद्देमाल जप्त

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल. सोबत पोलीस महानिरीक्षक राजेश कुमार.

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात आतापर्यंत बेकायदेशीर मद्य, रोख रक्कम, ड्रग्स, मौल्यवान वस्तू आणि इतर बेकायदा वस्तू मिळून सुमारे २.४४ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिली.
आल्तिनो येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलीस महानिरीक्षक राजेश कुमार यावेळी उपस्थित होते. विधानसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि मोकळ्या वातावरणात व्हावी. या काळात पैशांचा वापर होऊ नये, यासाठी निवडणूक आयोग तसेच निवडणुकीशी संबंधित पोलीस, प्रशासन चोवीस तास काम करीत आहे. निवडणूक आयोगाने ४० मतदारसंघांत ८१ गस्ती पथकांची नेमणूक केली असून, ही पथके चोवीस तास सर्वच मतदारसंघांवर नियंत्रण ठेवून आहेत, असे कुणाल म्हणाले.
आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत ३२९ तक्रारी ‘सी व्हीजील अॅप’द्वारे मिळालेल्या आहेत. त्यातील २१९ तक्रारीत तथ्य आढळून आल्याने आयोगाने आचारसंहिता उल्लंघन केलेल्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या अॅपसह नागरिक, वृत्तपत्रे तसेच सोशल मीडियाच्या विविध माध्यमांद्वारे आचारसंहिता उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट होताच गस्तीपथके, पोलीस तत्काळ संबंधित ठिकाणी छापे टाकून कारवाई करीत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
‘सी व्हीजील अॅप’द्वारे आलेल्या तक्रारींपैकी अनेक तक्रारी या कोविड मार्गदर्शक तत्त्वांसंदर्भात आहेत. राज्यात कोविड प्रसार वाढत असल्याने घरोघरी प्रचार करण्यासाठी केवळ पाच जणांना मान्यता देण्यात आली आहे. तर ५० जणांच्याच उपस्थितीत बैठका घेता येऊ शकतात. असे असतानाही अनेकजण मार्गदर्शक तत्त्वांना तिलांजली देत प्रचार करीत आहेत, असे ते म्हणाले. निवडणूक आचारसंहितेचे पालन करणे सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरात आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ अॅपद्वारे किंवा आपल्या भागातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहनही कुणाल यांनी केले.

जप्त केलेला एेवज

मद्य : १.९८ कोटी
ड्रग्स : २८.७५ लाख
रोख रक्कम : ४.३९ लाख
इतर बेकायदा वस्तू : १०.५४ लाख
मौल्यवान धातू : २ लाख

अर्ज भरण्यास पाचच दिवस मिळणार!

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २१ ते २८ जानेवारी असे आठ दिवस देण्यात आले आहेत. परंतु, या काळात तीन सुट्ट्या असल्याने अर्ज भरण्यासाठी पाचच दिवस मिळणार आहेत. सुट्टीच्या तीन दिवसांत अर्ज सादर करता येणार का, असा प्रश्न पत्रकारांनी कुणाल यांना विचारला असता, कायद्यानुसार सुटीच्या दिवशी उमेदवारी अर्ज सादर करता येणार नाही. त्यामुळे अर्जांसाठी पाचच दिवस मिळतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

पहिल्या दिवशी तिघांनी सादर केले अर्ज

उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी केवळ तिघांनीच अर्ज सादर केले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अ​धिकारी कुणाल यांनी दिली. या तिघांत माजी मंत्री गोविंद गावडे यांनी सर्वप्रथम अर्ज भरण्याचा मान मिळवला. त्यानंतर मंत्री नीलेश काब्राल व नावेली येथील दिग्विजय चव्हाण यांचा समावेश आहे.

हेही वाचा