आर्थिक फसवणुकप्रकरणी जॉनी पिंटोला जामीन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd January 2022, 12:29 Hrs
आर्थिक फसवणुकप्रकरणी जॉनी पिंटोला जामीन

पणजी : राज्यातील गुंतवणूकदारांना अधिक व्याजाचे आमिष दाखवून कंपनीने दीड कोटीहून जास्त रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून तिघा संशयितांना अटक केली होती. या प्रकरणातील जॉनी पिंटो या संशयिताला पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने २५ हजार रुपये व इतर अटीवर जामीन मंजूर केला आहे.

आर्थिक गुन्हा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संशयित विशू देव आणि त्याची पत्नी मारिया फर्नांडिस, देवबहादूर नेपाली आणि जॉनी पिंटो या भागिदाराने प्रथम लक्ष्मी ट्रेडर्स या नावाने वास्को, म्हापसा, डिचोली, मडगाव आणि कुडचडे येथे शाखा खुली करून कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी नागरिकांना ज्यादा व्याज्याचे आमिष दाखविण्यात आले. यासाठी प्रथम त्यांनी सोन्याच्या नाण्याची योजना सुरू केली. 

यासाठी गुंतवणूकदारांकडून दोन आठवड्याची योजना सुरु केली. त्यानंतर कंपनीने प्रत्येक आठवड्याला पाच टक्के व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कमीतकमी १ लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर वरील ठिकाणीतले सर्व शाखा बंद करून पसार झाले. 

यात १ कोटी ५० लाख रुपये सुमारे १०० हून जास्त नागरिकांनी गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची फसवणूक झाल्याचे कळल्यानंतर त्यांनी या प्रकरणी आर्थिक गुन्हा विभागात तक्रार दाखल केली. 

दुसरा गुन्हा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक पराग पारेख यांनी दाखल केला आहे. त्यानुसार, वरील संशयितापैकी विशू देव आणि जॉनी पिंटो या दोघांनी पणजी पाटो येथे नवीन कार्यालय उघडून रुबी ट्रेडर्स ही कंपनीमार्फेत नवीन योजना सुरू केली. त्यात त्यांनी गुंतवणूकदारांना सोन्याच्या नाण्याची योजना लागू करून सुमारे ४७ हजार रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.