पक्षाने यापूर्वीच माझी उमेदवारी जाहीर केली आहे : राणे

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
22nd January 2022, 12:27 Hrs
पक्षाने यापूर्वीच माझी उमेदवारी जाहीर केली आहे : राणे

पणजी : पक्षाने मला सांगितले तर मी विधानसभा निवडणूक लढवेन. पक्षाने यापूर्वीच उमेदवारी जाहीर केली असेल तर असे प्रश्न विचारण्यातही काही अर्थ नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पर्येचे आमदार प्रतापसिंग राणे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
भाजप उमेदवार जाहीर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपने पर्येची उमेदवारी प्रतापसिंग राणे यांच्याशी चर्चा करूनच दिव्या राणे यांना दिल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था पसरली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम आणि प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रतापसिंग राणेंची भेट घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान, गुरुवारी फडणवीस यांच्यावर निशाणा साधलेल्या राणे यांनी शुक्रवारी पक्षाने मला सांगितले तर मी विधानसभा निवडणूक लढवेन. पक्षाने यापूर्वीच उमेदवारी जाहीर केली असेल तर असे प्रश्न विचारण्यातही काही अर्थ नाही, असे वक्तव्य केल्याने पर्येतून काँग्रेसतर्फे तेच निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झाली आहे.

राणेंनी असे दिले होते फडणवीस यांना उत्तर

- देवेंद्र फडणवीस आपल्याबाबत जे बोलले ते पूर्णपणे चुकीचे आहे. पर्ये म्हणजे माझी बागायत नाही.
- फडणवीस यांच्यासोबत राजकारणावर चर्चा झाली नाही. तसेच त्यांना कोणाचे नावही सांगितले नाही.
- याबाबतीत आपल्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर होत आहे. तसे कोणी करू नये.