२६AS करदात्याची कुंडली

एका पॅन क्रमांकासंदर्भात कर-कपातीचे झालेले सर्व व्यवहार एकत्रितपणे दाखवणारे कागदपत्र म्हणजे फॉर्म २६ एस. टीडीएस (टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स), टीसीएस (टॅक्स कलेक्टेड ऍट सोर्स), रिफंड म्हणजे परतावा, इत्यादी संदर्भातील सगळी माहिती असते.

Story: तिचे नियोजन | CA राधिका काळे |
22nd January 2022, 11:05 Hrs
२६AS करदात्याची कुंडली

निशाने आपले इन्कम टॅक्स रिटर्न वेळेत भरले होते. ती एका खाजगी आस्थापनात नोकरीला होती. वेळच्या वेळी रिटर्न भरूनसुद्धा एके दिवशी तिला आयकर विभागाकडून नोटीस आली. नोटिशीत असे नमूद केले होते की  तिने जाहीर केलेल्या उत्पन्नापेक्षा तिचे उत्पन्न प्रत्यक्षात अधिक होते. म्हणजेच तिने काही उत्पन्न लपवले होते आणि  त्यामुळे तिला जास्तीचा कर भरणे अनिवार्य होते. निशा गोंधळून गेली. हे असे कसे होऊ शकते ह्यावर तिचा विश्वास बसेना. नोटीस घेऊन ती तातडीने माझ्याकडे आली. गोंधळलेल्या मनस्थितीत. मी तिचा पॅन नंबर व पासवर्ड  वापरून तिचे अकाउंट जे आयकर खात्याच्या संकेतस्थळावर होते ते पाहिले असता तिने आपले पगारी उत्पन्न अचूक जाहीर केले होते. परंतु कायम ठेवीवरील व्याज आयकर रिटर्नमध्ये दाखवले नव्हते. त्यामुळे ते व्याज व त्यावरील कर तिने भरला नसल्याने हा गोंधळ उडाला होता. तिच्या वडिलांनी तिच्या नावे वाढदिवसाच्या निमित्ताने मुदत ठेव भेट दिली होती. ह्याबद्दल संपूर्ण माहिती निशाकडे होती. परंतु आयकर रिटर्न भरताना ही गोष्ट ती विसरून गेली होती. नेमका इथेच घोळ झाला होता. आपल्याला प्रश्न पडेल की मला हे कसे समजले? तर आयकर खात्याच्या e -filing  पोर्टलवर आपल्याला २६-AS नावाची एक सुविधा पाहावयास मिळते. २६ AS म्हणजे थोडक्यात कर दात्यांची कुंडलीच असते. एका पॅन क्रमांकासंदर्भात कर-कपातीचे झालेले सर्व व्यवहार एकत्रितपणे दाखवणारे कागदपत्र म्हणजे फॉर्म २६ एस. टीडीएस (टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स), टीसीएस (टॅक्स कलेक्टेड ऍट सोर्स), रिफंड म्हणजे परतावा, इत्यादी संदर्भातील सगळी माहिती. जसे की टॅक्स कोणी कापला?, कधी, केव्हा, किती कापला? २६ASलाच टॅक्स क्रेडिट स्टेटमेंट असेही म्हणतात .

इनकम टॅक्स रिटर्न भरण्यापूर्वी म्हणूनच सर्वात आधी फॉर्म AS डाउनलोड करावा. हा फॉर्म आपल्याला आयकर खात्याच्या संकेतस्थळावर आपल्या पॅन क्रमांक व पासवर्ड घातल्यानंतर आपल्या अकाउंटमध्ये जाऊन बघता येतो. बऱ्याच वेळेला असेही होते की बँकेने किंवा अन्य व्यक्तीने आपल्या उत्पन्नावर कर कापलेला असतो पण तो ह्या २६AS फॉर्ममध्ये दिसत नाही. आपला पॅन क्रमांक न घालता चुकीचा पॅन क्रमांक घातल्यामुळे सदर समस्या उद्भवू शकते. म्हणूनच सर्वात आधी फॉर्म २६AS  नजरेखालून घातल्यास संभाव्य चुका टाळता येतात. तसेच ह्या फॉर्ममध्ये वेळोवेळी सुधारणा केलेल्या आहेत अन ह्या पुढेही होत राहतील. आपण जे आयकर रिटर्न भरतो त्याचे मूल्यांकन (अससेसमेंट) आयकर विभागातर्फे केले जाते. अश्या मूल्यांकनाच्या नोंदीसुद्धा ह्या फॉर्ममध्ये समाविष्ट करण्याचा मानस आहे. त्यामुळे प्रत्येक करदात्याने हे आयकर रिटर्न भरण्यापूर्वी नक्कीच बघितले पाहिजे. ह्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्रच  तुमचे भविष्यातील मन:स्वास्थ्य ठरवतील.


२६AS एकंदर ८ भागात विभागाला गेला आहे

१) ह्या विभागात एकूण तीन उपविभाग आहेत.

(अ) इथे आपल्याला आपल्या उत्पन्नावर कापलेला कर, उत्पन्न, कर कधी कापला, कापणाऱ्याचे तपशील, वगैरे माहिती मिळते. इथे पगारी उत्पन्न, व्याज, इत्यादी प्रकारच्या उत्पन्नाचा समावेश होतो.

(आ) फॉर्म १५G /१५H वरती कर कापला जातो त्याचे तपशील इथे पाहावयास मिळतात.

(इ) ह्या विभागात अचल संपत्ती विक्री वरती कापलेला कर, भाड्यावरती कापलेला कर, आयकर कलाम १९४M खाली कापलेला कर आणि उत्पन्न. (विक्रेता, जमीनमालक, यांच्या करिता)

२) टॅक्स कॉलेक्टड ऍट सोर्स (TCS).

३) विभाग १ आणि २ सोडून इतर भरलेल्या कराचा तपशील जसे की स्व मूल्यांकन कर (सेल्फ असेसमेंट टॅक्स), आगाऊ कर (ऍडव्हान्स टॅक्स).

४) आयकर विभागाकडून आलेला कर परतावा (इन्कम  टॅक्स रिफंड).

५) SFT (आर्थिक व्यवहारांचा तपशील). आयकर विभागातर्फे काही महत्वाच्या व्यवहारांवरती नजर ठेवी जाते. अश्या सर्व व्यवहारांची नोंदणी  इथे मिळते. जास्त मूल्यांचे आर्थिक व्यवहारावर आयकर विभागाची थेट नजर असल्याने सावधगिरी बाळगावी. असे आर्थिक व्यवहार बँकांकडून आयकर खात्याला कळविणे बंधनकारक  असल्याने ती माहिती आपोआपच आयकर खात्याकडे जमा होत असते.

६) ह्या विभागात अचल संपत्ती विक्री वरती कापलेला कर, भाड्यावरती कापलेला कर, आयकर कलम १९४M खाली कापलेला कर आणि उत्पन्न .(खरेदीदार ,भाडेकरू ,इत्यादी करिता)

७) टीडीएस स्टेटमेंट फायलिंग  मधील चुका.

८) वस्तू आणि सेवा कर संबंधित आर्थिक उलाढाल -फॉर्म ३B मध्ये दाखवलेली उलाढाल.