आता सर्व मदार मतदारांवरच

Story: अंतरंग | गणेश जावडेकर |
20th January 2022, 12:34 Hrs
आता सर्व मदार मतदारांवरच

गोव्यासह इतर पाच राज्यातील निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्याने राजकीय पक्ष तसेच राजकीय पुढाऱ्यांचा शिगमा सुरू झाला आहे. राजकारण तसेच निवडणुका हा गंभीर विषय आहे.  ह्या विषयात आरोप प्रत्यारोप, दिखाउपणा तसेच स्वार्थापेक्षा  चर्चा, संवाद आणि अभ्यासुपणा हे गुण असायला हवे. हे गुण नसल्याने अलीकडच्या काळात निवडणुकांना शिगमा वा राजकीय तमाशाचे स्वरूप आलेले आहे. ह्या वेळच्या निवडणुकीचा विचार केला, तर तमाशाचे स्वरूप काही वेगळेच आहे. तमाशा किंवा शिगम्याचे हे और स्वरूप आहे. मतदानाची तारीख जाहीर होण्यापूर्वीच राजकीय पक्षाचे पुढारी तसेच आमदारांच्या माकडउड्या सुरू झाल्या. निवडून येण्याची शक्यता किंवा मंत्रिपद मिळण्याची शक्यता कोणत्या पक्षात आहे, ह्याचा विचार करून आमदारांनी राजीनामे देउन दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. काहींनी उमेदवारी न मिळताच दुसऱ्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली. राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. सर्व पक्षांच्या याद्या जाहीर झाल्यानंतर बरेच जण पक्षाचा त्याग करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेत. ह्यामुळे माकडउड्या वा तमाशाचा पहिलाच अंक सध्या सुरू आहे. उमेदवारीसाठी इच्छुक सार्वजनिक क्षेत्रातील एखादी व्यक्ती ज्या पक्षावर जाहीरपणे आरोप करते आणी निवडणुकीच्या तोंडावर त्याच पक्षात प्रवेश करते आणी उमेदवारी मिळविते, ह्याला काय म्हणावे?

दुसरी गोष्ट म्हणजे ह्यावेळचे निवडणुकीचे वातावरण सर्वस्वी वेगळे आहे. करोना महामारीची तिसरी लाट सुरू आहे. दररोज हजारो नवे रूग्ण मिळत आहेत. शिवाय काही रूग्णांचे बळीही जात आहेत. यासाठी मतदारांच्या किंवा लोकांच्या सुरक्षेचा विचार प्रत्येक राजकीय पक्षाने तसेच उमेदवाराने करायला हवा. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रचारावर निर्बंध घातले आहेत. जाहीर सभांवर बंदी घालतानाच उमेदवारासह प्रचारासाठी फक्त पाच जणांना फिरण्याची मुभा दिली आहे. ह्या निर्बंधांचे वा अटीचे सर्रास उल्लंघन होत आहे. उमेदवारी जाहीर होण्या पूर्वीपासून बहुतांशी इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला सुरवात केलेली आहे. उमेदवारा सोबत फिरताना पाच पन्नास नव्हे तर शेशंभर पेक्षा अधिक कार्यकर्त्यांचो ताफा दिसत आहे. ह्या प्रकरामुळे करोनाचो धोका वाढणार नाही तर काय? संभाव्य उमेदवारांनी जसे करोनाचे भान नाही तसेच त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनाही नाही, असेच म्हणावे लागेल.

राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होण्यास सुरवात झाली आहे. ह्यामुळे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. फेब्रुवारी सुरू झाला की मतदारसंघात कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार आहे, एकूण किती उमेदवार आहेत, हे स्पष्ट होणार आहे. व्हॅलेंटाईन डेच्या शुभमुहूर्तावर चाळीस प्रतिनिधी निवडण्यासाठी गोवेकरांना मतदान करायचे आहे. उमेदवारांचे चारित्र्य, कार्यक्षमता व त्याचे सार्वजनिक क्षेत्रातले कार्य ह्याचा विचार मतदारांनी करायला हवा. जाहीरनामे, आरोप प्रत्यारोप व आश्वासनांना भुलून न जाता डोळसपणे मतदानाचे कर्तव्य मतदारांनी बजावण्याची गरज आहे. इतर राज्यांच्या तुलनेत गोवा हा साक्षरतेत अग्रेसर आहे. योग्य प्रतिनिधींची निवड करून लोकशाहीचा पाया भक्कम करण्याची जबाबदारी आता राजकारण्यांवर नाही, तर ती मतदारांवरच आहे.