पालयेतील सोपटे समर्थकांचा मगो पक्षात प्रवेश


14th January 2022, 11:42 pm
पालयेतील सोपटे समर्थकांचा मगो पक्षात प्रवेश

मगो पक्षात प्रवेश केलेल्या आमदार सोपटे यांच्या समर्थकांसह सागर तिळवे, प्रसाद पर्व, जीत आरोलकर, देवेंद्र प्रभुदेसाई व इतर. (निवृत्ती शिरोडकर)

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पेडणे : आमदार दयानंद सोपटे यांच्या कार्याला कंटाळून आणि सरकारी नोकऱ्या भलत्यांनाच दिल्याने नाराजी व्यक्त करून पालयेतील भाजप युवा मोर्चा सरचिटणीस सागर तिळवे, माजी सरपंच प्रसाद परब यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी मगो पक्षात प्रवेश केला.
पालये येथे मगो पक्षाचे उमेदवार जीत आरोलकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर प्रवेश कार्यक्रम १४ रोजी आयोजित केला होता. यावेळी आमदार सोपटे यांच्या अनेक समर्थकांनी मगोत प्रवेश केला.
या कार्यक्रमाला मगोचे नेते राघोबा गावडे, देवेंद्र प्रभुदेसाई, दयानंद मांद्रेकर, माजी सरपंच सुभाष आसोलकर, पंच सदस्य गुणाजी ठाकूर, पंच सदस्य प्रवीण वायंगणकर, उदय मांद्रेकर आदी उपस्थित होते.
यावेळी सागर तिळवे, प्रसाद परब, सज्जन तिळवे, लाडू तिळवे, योगेश तिळवे, कमलाकर परब, चंद्रकांत तिळवे, सुभाष तिळवे, किशोर तिळवे, प्रभाकर तिळवे आणि काही प्रमुख महिलांनी यावेळी मगोत प्रवेश केला.
यावेळी सागर तिळवे म्हणाले, जीत आरोलकर यांच्या कार्याने आकर्षित होऊन आपण मगो पक्षात प्रवेश केला आहे. आमदार सोपटे यांना २०१७ व २०१९ या दोन्ही निवडणुकीत विजयी केले, मात्र त्यांच्या कार्यपद्धतीत बदल झाल्याने कंटाळून आपण भाजप सोडल्याचे सांगितले. ठरावीक युवकांना सरकारी देण्याचे धोरण त्यांनी अवलंबले होते. आता आम्ही पालये गावातून मगोला आघाडी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रसाद परब म्हणाले, आमचा कोणत्या पक्षावर रोष नाही, मात्र युवकांची कामे व्हायला हवी होती तशी ती झाली नाही.
यावेळी जीत आरोलकर म्हणाले, मांद्रेमधून मगोला आता चांगले दिवस येत असून परिवर्तन होणार आहे. राज्यात मगो - तृणमूल युतीचे सरकार सत्येवर येणार आहे. सरकार स्थापन झाल्यावर युवक व महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. २० वर्षांनंतर पुन्हा मांद्रे मतदारसंघात मगोचा आमदार निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देवेंद्र प्रभुदेसाई म्हणाले, जशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे अनेक पक्षांतील कार्यकर्ते, समर्थक मगो पक्षात येत आहेत, त्या सर्वांचे आम्ही स्वागत करतो. यावेळी दयानंद मांद्रेकर आणि राघोबा गावडे यांची भाषणे झाली.