विरोधकांच्या महाआघाडीसाठी काँग्रेस अनुत्सूक!

मोईत्रा, शरद पवारांचे प्रयत्न फोल ठरण्याची शक्यता

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
14th January 2022, 11:18 pm
विरोधकांच्या महाआघाडीसाठी काँग्रेस अनुत्सूक!

पणजी : राज्यात विरोधी पक्षांच्या महाआघाडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या गोवा प्रभारी महुआ मोईत्रा तसेच गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई प्रयत्नशील असले, तरी काँग्रेसने मात्र महाआघाडीच्या विषयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
काँग्रेसने आतापर्यंत ज्या पंधरा मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले आहेत, त्यातील काही मतदारसंघांत मगोपनेही आपले उमेदवार निश्चित केले आहेत. काही मतदारसंघांत तृणमूल काँग्रसही उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे. तर, त्यातील दाबोळी मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. अशा परिस्थितीत उमेदवार जाहीर केलेल्या मतदारसंघांत वाटाघाटी करण्यास काँग्रेस तयार नसल्याने विरोधी पक्षांच्या महाआघाडीचा विषय संपल्यात जमा असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, मगोप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन लढणे गरजेचे आहे. महाआघाडी न झाल्यास मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजप उमेदवारांना होऊ शकतो, असा अंदाज वर्तवून विजय सरदेसाई यांनी ‘टीम गोवा’च्या नावाने महाआघाडीचा विषय ताणून धरला आहे. तृणमूलच्या प्रभारी महुआ मोईत्रा यांनीही महाआघाडीसाठी दोनवेळा काँग्रेसला साद घातली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील निवडणुकीनंतरच्या युतीचे शिल्पकार शरद पवारही याबाबत काँग्रेसच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करीत आहेत. परंतु, काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम आणि प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सद्यःस्थितीत केवळ गोवा फॉरवर्डला सोबत घेऊन निवडणुकीस सामोरे जाण्याचे निश्चित केले आहे, अशी माहितीही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिली.

गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे राज्यात भाजपविरोधी वातावरण आहे. गोमंतकीय जनतेला पुन्हा काँग्रेस सत्तेवर हवा आहे. त्यामुळे जनता इतर पक्षांपेक्षा काँग्रेसला जवळ करेल, असा ठाम विश्वास पी. चिदंबरम आणि गिरीश चोडणकर यांना आहे. त्यामुळेच त्यांनी महाआघाडीच्या विषयाकडे दुर्लक्ष केले आहे, असे काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा