गृहविलगीकरणातील बाधित ‘राम भरोसे’

टेलीमेडिसिन सेवा कोसळली; राज्यात कोविड कीटची कमतरता

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
14th January 2022, 11:14 pm
गृहविलगीकरणातील बाधित ‘राम भरोसे’

संसर्गाचा वेग : ३९.१० %
नवे बाधित : ३,१४५
दिवसभरातील बळी : ३

पणजी : कोविडच्या तिसऱ्या लाटेसाठी इस्पितळे सज्ज असल्याचे सरकारकडून सांगितले जात असले तरी, इतर सर्व व्यवस्था कोलमडल्यामुळे गृहविलगीकरणातील बाधितांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गृहविलगीकरणातील रुग्णांचा आढावा घेण्याबरोबरच त्यांना मानसिक आधार देण्यासाठी सुरू केलेली टेलीमेडिसिन सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. तर, ऑक्सिमीटर, थर्मामीटरसह औषधांच्या किटचीही प्रचंड कमतरता असल्याने बाधितांना खासगी औषधालयांकडे धाव घ्यावी लागत आहे. एकंदरीत आरोग्य यंत्रणांची स्थिती हाताबाहेर चालली आहे.
राज्यात २८ डिसेंबरपासून कोविडच्या तिसऱ्या लाटेने उसळी घेतली आहे. गुरुवार सायंकाळपासून शुक्रवार सायंकाळपर्यंत या २४ तासांच्या कालावधीतील स्थितीचा अहवाल आरोग्य खात्याने शुक्रवारी सायंकाळी जारी केला आहे. या अहवालानुसार ३,१४५ नवीन बाधितांची नोंद झाली आहे. यातील ३ हजार १२० रुग्णांनी गृहविलगीकरणात राहणे पसंत केले आहे. सध्याच्या घडीला १० ते १२ हजार रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. या रुग्णांना यंत्रणांनी वाऱ्यावर सोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत गृहविलगीकरणातील बाधितांची स्थिती गंभीर होऊ नये, यासाठी त्यांना आरोग्य केंद्रांतून विनामूल्य कीट दिले जायचे. यामध्ये एन ९५ मास्कपासून ऑक्सिमीटर, थर्मामीटर, तापावरच्या गोळ्या, क जीवनसत्वाच्या गोळ्यांसह सॅनिटायझरही दिला जायचा. शिवाय प्रतिदिन तीन वेळा फोनवरून तज्ज्ञ डॉक्टर त्याचा आढावा घ्यायचे. ही सर्व यंत्रणा तिसऱ्या लाटेत कोलमडली आहे. मंत्री आणि आमदार प्रचारात मग्न असून आरोग्य खात्याकडे लक्ष देण्यासाठी कोणाला वेळ आहे का, असा सवाल बाधितांकडून विचारला जात आहे.

३,१४५ नवे; १८,५९७ सक्रिय रुग्ण

गुरुवार ते शुक्रवारच्या चोवीस तासांत राज्यात कोविडचे ३,१४५ नवे रुग्ण आढळून आले. या कालावधीत ८,०४३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यातील ३,१४५ जणांचे अहवाल बाधित असल्याचे आले. त्यामुळे शुक्रवारी राज्याचा कोविड बाधित होण्याचा दर ३९.१० टक्के झाला. याच कालावधीत कोविडमुळे आणखी तिघांचा मृत्यू झाला. तर सक्रिय रुग्ण १८,५९७ झाले आहेत. आणखी १,४३२ जणांनी कोविडवर मात केली. परंतु, बाधित होणाऱ्यांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे बरे होण्याचे प्रमाण ८९.१४ टक्क्यांपर्यंत खाली आहे.

हेही वाचा