बिकानेर एक्स्प्रेस रुळावरून घसरली

तिघांचा मृत्यू : २० पेक्षा अधिक जखमी

|
13th January 2022, 10:55 Hrs
बिकानेर एक्स्प्रेस रुळावरून घसरली

कोलकाता : पटना-गुवाहाटीकडे जाणाऱ्या बिकानेर एक्स्प्रेसचे काही डबे गुरुवारी पश्चिम बंगालमधील डोमोहनी येथे रुळावरून घसरले. प्राथमिक माहितीनुसार, रेल्वेचे पाच ते सहा डबे रुळावरून घसरून रुळाजवळ उलटले. या घटनेत किमान तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय २० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, एका प्रवाशाने सांगितले की, ट्रेनमध्ये अचानक धक्का बसला, त्यानंतर डबे उलटले. अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यताही प्रवाशाने व्यक्त केली आहे.
भारतीय रेल्वेनेही या अपघाताबाबत निवेदन जारी केले आहे. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत ट्रेनचे सुमारे १२ डबे घसरले. डीआरएम आणि एडीआरएम अपघात-निवारण ट्रेन आणि मेडिकल व्हॅनसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. याशिवाय शुक्रवारी सकाळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव स्वतः घटनास्थळी पोहोचणार आहेत.
डोमोहनी स्टेशनपासून सर्वात जवळचे स्थान जलपाईगुडी असल्याची नोंद आहे. येथून मदत गाडीसह रुग्णवाहिकाही पाठवण्यात आल्या आहेत. सध्या पोलीस आणि स्थानिक लोक मदतकार्यात गुंतले आहेत. रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना मैनागुरी हॉस्पिटल आणि जलपाईगुडी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
ममता बॅनर्जींनी घेतली दखल
हा रेल्वे अपघात झाला त्या वेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत करोनाव्हायरसच्या परिस्थितीवर चर्चा करत होत्या. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बचाव आणि मदत कार्याला गती देण्यास सांगितले. यासोबतच कोलकातालाही या घटनेवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.