धालोत्सव

जत्रोत्सवानंतर ज्या उत्सवाची महिलावर्ग आवर्जून वाट पाहत असतो तो म्हणजे धालोत्सव. पौष महिन्यात साजरा होणारा धालोत्सव हा तर स्त्रीमनाला आनंदाचे उधाण आणणारा उत्सव.

Story: लोकसंस्कृती।पिरोज नाईक |
09th January 2022, 12:27 Hrs
धालोत्सव

वाळा, उन्हाळा पुन्हा पावसाळा असे हे ऋतुचक्र सतत फिरत असते. याबरोबरच आपल्या संस्कृतीप्रधान देशामध्ये सण-उत्सव, जत्रोत्सव, धालोत्सव, शिगमोत्सव साजरे होत असतात. जत्रोत्सवानंतर ज्या उत्सवाची महिलावर्ग आवर्जून वाट पाहत असतो तो म्हणजे धालोत्सव. पौष महिन्यात साजरा होणारा धालोत्सव हा तर स्त्रीमनाला आनंदाचे उधाण आणणारा उत्सव. या उत्सवाच्या निमित्ताने त्यांना चार-चौघात मिसळण्याची संधी मिळते. एक काळ असा होता की चूल-मूल आणि संसाराचा गाडा ओढत असताना त्यांना घराबाहेर पडणेही शक्य होत नसे. चूल आणि मूल हेच त्यांचे विश्व असे. त्यामुळे कधीकाळी हळदीकुंकू, दिवजोत्सव, धालोत्सव सणउत्सवाच्या निमित्ताने त्या घराबाहेर पडत. धालोत्सव तर त्यांच्या आवडीचा, मन रिझवणारा. गप्पा गोष्टींना ऊत आणणारा. समूहाने एकमेकांची उणीदुणी काढत आनंद उपभोगण्याचा. विरंगुळ्याचा उत्सव. मोठ्या श्रद्धेने वनदेवतेपरी आदर भावना व्यक्त करण्यासाठी त्या एकत्र जमून धालोत्सव साजरा करतात. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील महिलांना हा आनंद जास्त उपभोगायला मिळतो कारण धालोमांड तर विशेषतः ग्रामीण भागांमध्ये जास्त दिसून येतात.

'मांड' म्हणजे गावातील लोकांनी एकत्र जमून धार्मिक कार्य करण्यासाठी राखून ठेवण्यात आलेली पवित्र जागा. धालोंच्या दिवशी हा ‘मांड’ शेणाने सारवून स्वच्छ करतात. तिथे असलेल्या तुळसरुपी वनदेवतेची रंगरंगोटी करतात. काळोख पडल्यावर समई पेटवून ठेवतात. ‘मांडकर’ पूजाअर्चा करून सामूहिक गाऱ्हाणे घालतो व नारळ वाढवतो. ‘मांडकान्न’ समईला, वनदेवतेला हळद-कुंकू वाहून जमलेल्या महिलांना ‘गंध’ लावून ‘तिबा’ करते व ओळीला उभ्या असलेल्या सर्वांना ‘शिरणी’ वाटते. आणि धालो खेळाला सुरूवात होते.

पहिली ओळ- पाच पावले पुढे जाऊन तसेच पाच पावले मागे येते.

दुसरी ओळ- मोन्यो आयल्यो मोन्यो गेल्यो कित्याक गे सोयऱ्यांनो. 

धालो म्हणजे भारतीय जीवनप्रणालीचे मौखिक स्वरूपात राखून ठेवलेले यथार्थ वर्णन. पूर्वीचा समाज साक्षर नव्हता तरीसुद्धा आपल्या बुद्धिचातुर्याने निरनिराळी लोकगीते तयार करून लोककला सादर करण्या इतपत त्यांच्याकडे प्रावीण्य होते. म्हणूनच प्राचीन काळापासून मौखिक स्वरूपात चालत आलेला हा धालोत्सव आज आपल्यापर्यंत पोहोचला आहे. भूतकाळ व वर्तमानकाळातील जीवनमानामध्ये झालेल्या बदलांची कल्पना धालोगीतातून येते. त्याकाळची कुटुंबपद्धती, एकमेकांबद्दलची आपुलकी, आचार-विचार, आत्मीयता, निसर्गाप्रती आदरभाव या सर्व गोष्टींची कल्पना धालोगीतातून अधोरेखित होते.

 मालून  महिना  मालिनी पौर्णिमा धालो आरंभिल्या गे,

धालांनी खेळूंक येया गे तुमी धालो खेळूंक येया गे. 

मालून महिना अशुभ मानला जातो. या दिवसात भुताखेतांच्या संचार असतो असे म्हणतात. त्यामुळे विशेषता या दिवसात कोणतेही शुभकार्य होत नाही. देवाचे नामस्मरण व्हावे या हेतूने हा धालोत्सव पौष महिन्यात साजरा करण्याची प्रथा असावी. कारण सर्व देवदेवतांची नावे घेऊनच मांडावर धालो गीतांचे गायन केले जाते.

 खण कुदळी खण कुदळी बारामण माती,

वनदेवते तुळशी मायेचे देऊळ बांधला मध्यान्ने रात्री|

पावस पडे पावस पडे वतांबे थेंबेss वतांबे थेंबे, 

रंभा- गुरूच्या देवळाक रतन खांबे|

आशे बाए आशे गेs करंगुट भाताचे आशे गे,

 वाटांऱ्या पुरसाच्या देवळाक भांगराचे वाशे गेI

 कळे बाए कळे गेs  मोगऱेचे कळे,

 अनंता- ब्रह्माच्या देवळाक भांगराचे नळे गे|

 वयले वयले रान बाए फळसाचे,

बेताळ रवळनाथाचे देऊळ बांधला कळसाचे|

वयले वयले रान बाए उसकेचे,

चाना सूर्याचे देऊळ बांधला बसकेचे|

वयले वयले रान बाए आक्रीचे,

लावा भूताक जेवण केला साखरेचे|

पावस पडे पावस पडे कातयात,

सर्वै देवांची देवळा बांधल्या रातयात|

वन  म्हणजे जंगल आणि या जंगलातील धर्तरी म्हणजेच धरित्री ही वनदेवता. तिच्या उदरातून लता-वेली, झाडे-झुडपे जन्म घेतात. आपल्याला मिळणारी शुद्ध हवा, पाऊस, पाणी, गाळाच्या जमिनीतून घेतली जाणारी कुळीथ, नाचणी, वरी यासारखी पिके तर नवदेवतेचीच देणगी आहे. सृजनशीलतेची शक्ती असलेल्या वनदेवतेच्या कृपा प्रसादाची महती ज्यांना पटली आहे तो कष्टकरी समाज मोठ्या उत्साहाने धालोत्सव साजरा करतो.

पहिली माझी ओवी पहिला माझा नेम,

तुळशीखाली राम पटी वाचे.

दुसरी माझी ओवी दुधाची भावना,

लक्ष्मी नारायणा नमस्कार.

 तिसरी माझी ओवी त्रिकुटाचे परी, 

ब्रह्मा-विष्णुवरी बेल वाहू. 

 चौथी माझी ओवी चवथीच्या सणा,

 मोती तुझ्या भांगा राधाबाई.

 पाचवी माझी ओवी पाच पांडवासी,

पाठीच्या बांधवासी राज्य येऊ.

शेतात, भाटात कष्ट करून मोठ्या हिकमतीने मिळवलेल्या चार पैशातून केलेले एक- दोन दागिने, नाकात नथ,  नऊवारी लुगडं, अंबाड्यावर अडुळशाच्या अथवा अबोली फुलांपासून बनवलेली वेणी माळून रात्रीच्या पिठोर चांदण्यात चांदोमामाला सोबतीला घेऊन एकमेकांना हाका मारत या सुहासिनी ज्यावेळी मांडावर पोहोचतात त्यावेळी गलका वाढत जातो. हसणे-खिदळणे आवाज आणि जवळपासच्या घरातील झोपलेल्या महिलांचे पाय आपोआपच मांडाकडे वळतात.