आता भाजप स्वबळावरच लढेल : तानावडे

निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकीत रणनीतीवर चर्चा


07th December 2021, 12:16 am
आता भाजप स्वबळावरच लढेल : तानावडे

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : भाजप-मगो युती व्हावी असे आम्हाला वाटत होते. पण, आता मगोने तृणमूल काँग्रेसशी संधान साधले आहे. भाजप मगोव्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षाशी युती करू शकत नाही. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर लढून स्पष्ट बहुमत मिळवेल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सोमवारी स्पष्ट केले.
भाजपच्या राज्य निवडणूक व्यवस्थापन समितीच्या पणजीत झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. युती झाली किंवा नाही याचा भाजपला काहीही फरक पडणार नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची तयारी पक्षाने केली आहे. पक्षाने प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची चाचपणीही सुरू केली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आठ दिवसांत भाजपची निवडणूक समिती जाहीर होईल आणि सर्वच ठिकाणच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा होईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, प्रभारी सी .टी. रवी, सहप्रभारी दर्शना जारदोश, जी. किशन रेड्डी, निवडणूक व्यवस्थापन समितीचे निमंत्रक तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पणजीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन आणि जाहीरनामा समितीची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन मंत्री सतीश धोंड, निवडणूक व्यवस्थापन समितीचे सहनिमंत्रक तथा माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, वीजमंत्री नीलेश काब्राल, प्रदेश उपाध्यक्ष दत्तप्रसाद खोलकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, भाजपचे खजिनदार संजीव देसाई, उपाध्यक्ष रमेश तवडकर, आमदार ग्लेन टिकलो, सुभाष शिरोडकर, नीळकंठ हळर्णकर, सरचिटणीस दामू नाईक, उपाध्यक्ष कुंदा चोडणकर, सुवर्णा तेंडुलकर बैठकीला उपस्थित होते. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमताने जिंकून आणण्यासाठी आखण्यात येणाऱ्या रणनीतींवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
...................................
तानावडेंचे चोडणकरांना आव्हान
महिला लैंगिक अत्याचार प्रकरणातील मंत्र्याचे नाव अद्याप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी जाहीर केलेले नाही. त्यामुळे त्यांचे आरोप हवेतील बाण होते, हे सिद्ध झाले आहे. चोडणकर यांनी संबंधित मंत्र्याचे नाव जाहीर करून त्याच्यावर केलेले आरोप सिद्ध करावेत. तसे झाल्यास संबंधित मंत्र्याची तत्काळ हकालपट्टी केली जाईल, असेही तानावडे यांनी स्पष्ट केले.