दाबोळी अपघातात युवती जागीच ठार

कारची ट्रेलरला धडक, दोघे गंभीर जखमी : कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा

|
06th December 2021, 11:26 Hrs
दाबोळी अपघातात युवती जागीच ठार

ट्रेलरला धडकलेली कार. (अक्षंदा राणे)

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : सोमवारी मध्यरात्री दाबोळीहून विमानतळ मार्गाकडे जाणारी कार रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला धडकल्याने कारमधील एलिझा देवा लैश्रम (१९, मणिपूर) ही महिला जागीच ठार झाली. तर कारचालकासह दोघेजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले. त्या कारच्या दर्शनी भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या अपघातामुळे रस्त्याकडेला रात्रीच्या वेळी उभी करण्यात येणारी अवजड वाहने चर्चेत आली आहेत.
या अपघाताची दखल घेताना वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी रस्त्याकडेला वाहने उभी करण्यात येऊ नयेत यासाठी पोलीस व वाहतूक खात्यातर्फे खास मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले. यापूर्वीही अशाप्रकारे रस्त्याकडेला उभी करण्यात आलेल्या अवजड वाहनांना धडकून जीवितहानी होण्याचे प्रकार घडले होते. त्यावेळी पोलिसांनी काही दिवसासाठी कडक कारवाई केली. त्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू झाले.
दरम्यान, एका हॉटेलमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणारे सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास कारने दाबोळीहून विमानतळ मार्गाकडे चालले होते. परंतु, अचानक त्यांची कार रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रेलरच्या मागील चाकांना धडकली. ही ठोकर इतकी भयानक होती की त्या कारमधील मागच्या आसनावर बसलेली एलिझा जागीच ठार झाली. तर चालक व समोरच्या आसनावर बसलेली व्यक्ती जखमी झाले. याप्रकरणी वास्को पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन जखमीला उपचारासाठी इस्पितळात पाठविले. सदर अपघात नेमका कसा झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार त्या ट्रेलरला मागून धडकली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
चिखलीचे उपसरपंच कमलाप्रसाद यादव यांनी रस्त्याकडेला उभ्या करण्यात येणाऱ्या अवजड वाहनांसंबंधी आपण तक्रारी केल्या होत्या, असे सांगितले. परंतु, त्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. रस्त्याकडेला अवजड वाहने उभी करण्यात येऊ नयेत यासाठी चिखली पंचायतीतर्फे ठराव घेण्याचा इरादा त्यांनी व्यक्त केला.

रस्त्याकडेला असलेल्या गाड्यांवर होणार कारवाई
या अपघातप्रकरणी वाहतूक मंत्री गुदिन्हो यांनी गंभीर दखल घेतली आहे. अवजड वाहने रस्त्याकडेला उभी करण्यात येऊ नयेत यासाठी पोलीस, वाहतूक पोलीस, वाहतूक खाते संबंधितांविरोधात कारवाई करणार आहे. त्यासाठी खास मोहीम राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. सदर ट्रेलर काही कंपन्यांचे असतात. त्यांनी त्या अवजड वाहनांना योग्य पार्किंग जागा दिली पाहिजे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने चालक रस्त्याकडेला वाहन उभे करतात. त्यामुळे अशाप्रकारचे गंभीर अपघात होत असल्याचे त्यांनी सांगितले.