जगातील ३८ देशांत ओमिक्रॉनचा प्रसार

एकाही बाधिताचा मृत्यू नाही : भारतात विमान उड्डाणे वगळता निर्बंध नाहीत

Story: नवी दिल्ली : |
06th December 2021, 12:54 Hrs
जगातील ३८ देशांत ओमिक्रॉनचा प्रसार

नवी दिल्ली : 'ओमिक्रॉन'चा रुग्ण आढळणारे राजस्थान हे देशातील पाचवे राज्य ठरले आहे. आतापर्यंत कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली येथे ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले होते. आहेत. देशात एकूण २१ रुग्णांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. युरोपसह जगाच्या काही भागांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग आढळून आल्याने देशांनी निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. बहुतेक देशांनी ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे देशातील उड्डाणे थांबवली आहेत. भारतात सध्या असे कोणतेही निर्बंध नाहीत. दरम्यान, आतापर्यंत ३८ देशांत ओमिक्रॉन पोहोचला असून, अद्याप एकाही बाधिताचा मृत्यू नाही. ही सकारात्मक बाब आहे.
ओमिक्रॉनमुळे देशात संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता फारच कमी आहे. ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत, तिथे स्थानिक पातळीवर निर्बंध लागू केले जाऊ शकतात. राष्ट्रीय लॉकडाऊनची कोणतीही योजना नाही. सध्या अशा कोणत्याही पावलाची गरज नाही. या आव्हानाचा सामना करण्यासाठी देश सज्ज आहे, असे नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे. नागरिकांना प्रत्येक वेळी मास्क घालण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल. करोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यू झालेले. तेव्हाही लॉकडाऊन नव्हता. सध्या ऑमिक्रॉनपासून फारसा धोका नाही. त्यामुळे लॉकडाऊनची शक्यता नसल्यातच जमा आहे, असेही ते म्हणाले.
बॉक्स
लॉकडाऊनमुळे भारतासह संपूर्ण जगाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हेच कारण आहे की बहुतेक देशांना तशी स्थिती निर्माण होऊ द्यायची नाहीये. ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन हे 'शेवटचे शस्त्र' म्हणून वापरले जावे, असा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. भारतासह ३८ हून अधिक देशांमध्ये ओमिक्रॉनचा प्रसार झाला आहे, अशी माहितीही आरोग्य संघटनेने दिली आहे.
आफ्रिकेत लहान मुलांना
मोठ्या प्रमाणात लागण
ओमिक्रॉन या करोना विषाणूच्या नव्या स्वरुपाने जगभरात खळबळ उडवून दिली असतानाच दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या नव्या रुग्णांमध्ये एक धक्कादायक ट्रेन्ड दिसून येत आहे. देशात नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत लहान बालकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे दिसून आले आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या तज्ज्ञांनीदेखील या नव्या ट्रेन्डवर चिंता व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिकेत १६,०५५ रुग्णांना दाखल करण्यात आले होते; तर २५ करोनाबाधितांचा मृत्यू नोंदवण्यात आला आहे.