देशात ओमिक्रॉनचे आणखी दोन रुग्ण

झिम्बाब्वेहून आलेला प्रवासी गुजरातेत, तर आफ्रिकेतून परतलेला महाराष्ट्रात पॉझिटिव्ह


05th December 2021, 12:11 am
देशात ओमिक्रॉनचे आणखी दोन रुग्ण

नवी दिल्ली : करोना विषाणूचा अत्यंत धोकादायक प्रकार मानला जाणारा ओमिक्रॉनचा देशातील तिसरा रुग्ण गुजरातेत, तर चौथा रुग्ण महाराष्ट्रातील डोंबिवलीत आढळून आला आहे.
गुजरातच्या आरोग्य विभागाने सांगितले की, संक्रमित व्यक्ती झिम्बाब्वे येथून आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बाधित व्यक्तीचे वय ७२ वर्षे आहे. गुरुवारी त्याचा कोविड-१९ अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. गुजरातचे आरोग्य आयुक्त जय प्रकाश शिवहरे यांनी वृद्ध व्यक्तीला करोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराची लागण झाल्याची माहिती दिली.
महाराष्ट्रातील पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळला आहे. या रुग्णावर मागील काही दिवसांपासून लक्ष ठेवले जात होते. त्याचे नमुने जीनोम चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. शनिवारी या चाचणीचा अहवाल आला. या रुग्णाचे वय ३३ वर्षे असून तो २४ नोव्हेंबर २०२१ रोजी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून कल्याण-डोंबिवलीत आला होता तो दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईत दाखल झाला होता. त्याला २४ नोव्हेंबरला सौम्य ताप आला होता. त्याच्यावर कल्याण-डोंबिवलीतील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते. या रुग्णाच्या १२ अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि २३ कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला आहे. ते सर्व कोविड निगेटिव्ह निघाले आहेत. दिल्ली ते मुंबई या विमान प्रवासातील रुग्णाच्या २५ सहप्रवाशांचीही करोना चाचणी केली आहे. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
__
दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकात आलेले दहा प्रवासी बेपत्ता
कर्नाटकात सापडलेला देशातील पहिला ओमिक्रॉनबाधित रुग्ण रुग्णालयात दाखल करूनही रातोरात दुबईला पळून गेल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून परतलेले तब्बल १० प्रवासी विमानतळावरील अनिवार्य कोविड चाचणी चुकवून बेपत्ता झाल्याचे समोर येत आहे. या लोकांशी संपर्क होऊ शकलेला नाही, त्यांचे फोनही बंद आहेत. त्यामुळे त्यांना ‘बेपत्ता’ घोषित केले आहे. बेंगळुरू विमानतळावर कडेकोट बंदोबस्त असूनही अनिवार्य असलेली कोविड चाचणी चुकवत या दहा जणांनी तिथून पळ काढला. या प्रकारामुळे संतप्त झालेले राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी रात्रीतच या प्रवाशांना शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत.
__
जर आपण कोविड १९च्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा अभ्यास केला, तर तिसरी लाट तयार करू शकणाऱ्या व्हेरिएंटचे सर्व गुणधर्म त्याच्यात आहेत. मानवी प्रतिकारशक्तीला तो बेमालूमपणे चकवा देऊ शकतो, हे समोर आलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे.
_ डॉ. अनुराग अग्रवाल, संचालक, सीएसआयआर