नार्वेकरांच्या जाण्याने गोमंतकीय मराठी साहित्याची हानी

साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची शब्दसुमनांजली


28th November 2021, 11:48 pm
नार्वेकरांच्या जाण्याने गोमंतकीय मराठी साहित्याची हानी

फोटो : पु. शि. नार्वेकर
पणजी : गोमंतकीय मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे ज्येष्ठ कथालेखक पु. शि.नार्वेकर (९१) यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने गोमंतकीय मराठी साहित्याचे अपरिमित नुकसान झाले आहे.
नार्वेकर यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सांगे तालुक्यातील कुळे हे त्यांचे गाव. त्यांचे मराठी प्राथमिक शिक्षण वास्को येथे झाले. पोर्तुगीज सेगुंदग्रावपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला. प्रतिकूल परिस्थितीमुळे ते पुढील शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत; मात्र साहित्यक्षेत्रात त्यांनी आपली ओळख निर्माण केली. घाटदार कथालेखन करून त्यांनी साहित्यक्षेत्रात लक्षवेधी कामगिरी बजावली. कथा लेखनाबरोबरच त्यांनी कादंबरी, ललित निबंध, नाट्यलेखन केले. त्यांची १५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात ‘नवमीच्या रात्री’ या एकमेव नाटकाचा समावेश आहे.
खाण कंपनीत क्लर्क म्हणून सेवा बजावलेल्या नार्वेकर यांच्यावर बंगाली थोर लेखक शरदचंद्र चटर्जी यांचा मोठा प्रभाव होता. चटर्जी व त्यांच्या कादंबऱ्या हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. माशेल येथे आयोजित केलेल्या २७ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पेडणे येथे भरलेल्या २८ व्या संमेलनाचे उद्घाटन झाल्यावर आपल्याकडील सूत्रे सोपवून त्यांनी चिरनिद्रा धारण केली.
......
पु. शि. नार्वेकर हे गोमंतकीय ज्येष्ठ साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेल्याचे ऐकून दुःख झाले. मला ते पितृतुल्य होते. लहानपणापासून त्यांनी वाचनाचा छंद जोपासला होता. चित्रकलेतही त्यांनी रूची घेतली होती. प्रतिकुल परिस्थितीवर मात करून त्यांनी अभ्यास वाढवला. शरदचंद्र चटर्जी व त्यांच्या कादंबऱ्या हा त्यांचा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय होता. त्यांच्या महाभारतावरील पुस्तकाने मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. त्यांच्या जाण्याने सव्यसाची साहित्यिक हरपला आहे. साहित्य क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
_ डॉ. सोमनाथ कोमरपंत, ‘सव्यसाची’ समीक्षक
-------- ---------------------------------

गोमंतकीय मराठी कथेत सामान्य व्यक्तीचे जीवन चित्रित करून गोव्यातील कथेला खऱ्या अर्थाने नार्वेकरांनी श्रीमंत केले. शरदचंद्र चटर्जींच्या साहित्यातील नायिकांवर त्यांनी केलेले लेखन नवी दृष्टी देणारे आहे. माशेल येथील गोमंतक मराठी साहित्य संमेलनातील त्यांचे अध्यक्षीय भाषण अविस्मरणीय झाले. या व्रतस्थ लेखकाचे साहित्य आणि विचार प्रेरणा देतील.
- प्रा. अनिल सामंत, अध्यक्ष, गोवा मराठी अकादमी
-------------------------------------------

पु. शि. नार्वेकर यांचे साहित्य क्षेत्रातील कार्य प्रत्येकाला अभिमान वाटावा असेच आहे. पुराणातील अष्टनायिकांवर त्यांनी सुंदर लेखन केले आहे. साहित्य क्षेत्रात एवढे नाव कमावूनही त्यांना गर्व कधी झाला नाही. मृदुभाषी असा हा आदर्श लेखक पहिल्या पिढीतील शेवटचा मोठा साहित्यिक आम्ही गमावला आहे.
--जनार्दन वेर्लेकर, अध्यक्ष, गोमंत विद्या निकेतन

हेही वाचा