बालपण : पुन्हा एकदा जगण्यासारखं

Story: तिच्या मनातील । समीक्षा गुरूदास भगत, (� |
27th November 2021, 12:00 am
बालपण : पुन्हा एकदा जगण्यासारखं

बालपण हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. जो खूप मजेदार असतो. आपल्या आयुष्याचा एक कालखंड आपला इतका आवडीचा असतो की तो आपल्याला पुन्हा एकदा जगवासा वाटतो. उन्हाळा म्हटलं की काही जुन्या आठवणी जाग्या होतात. लहानपणीच्या आपल्या सगळ्या धमाल मज्जा केलेल्या गोष्टी आठवायला लागतात. वार्षिक परीक्षा संपायच्या आधीपासूनच उन्हाळी सुट्टीचे प्लॅन सुरू व्हायचे. खरंच ते दिवस किती मौल्यवान होते.  'लहानपण  देगा देवा ' असे आपण कितीही म्हटले तरी एकदा बालपण सरले की ते पुन्हा येत नाही. लहानपणी आपल्याला मोठे होण्याची ओढ असते, पण मोठे झाल्यानतंर मात्र लहानपणाची ओढ लागते. जुन्या आठवणी कितीही काढल्या तरी ते दिवस परत यायचे नाहीत. काहींचे बालपण इतके कष्टदायक किंवा भयावह असते की त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही.

आता लहान असलेल्या मुलांचे  बालपण मात्र हरवल्यासारखे वाटते. पूर्वी  जसे मुलांनी भरलेले मैदान दिसायचा ते आता खूप कमी पाहायला मिळते. आताच्या मुलांना बाहेर जाऊन मित्रांबरोबर खेळणे, भाटात चोरून कैऱ्या, काजू, शहाळी खाणे ह्या सारख्या गोष्टी त्यांना करायला आवडत नाही. कारण मोबाईल, टी. व्ही. सारखी यंत्रे मुलांचे मित्र बनले आहेत. आई वडील दोघंही कामाला जातात त्यामुळे घरी मुलांना सांभाळण्यासाठी बाई ठेवली जाते. मुलांना टीव्हीवर कार्टून लावून दिले की फारसे त्यांना बघावे लागत नाही. त्यामुळे टी. व्ही. ला खिळून राहायची त्यांची ती सवय पुढे कायम राहते. आपले मुल सर्वोतम असले पाहिजे, त्यांनी सर्व क्षेत्रात अव्वल असावे.  त्यांना नृत्य, संगीत, ड्रॉईंग, पोहणं ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे ह्यासाठी पालकाचे प्रयत्न असतात. ह्या अट्टाहासापायी मुलांचा बराच वेळ शाळा, ट्युशन कलासेस आणि ह्या सगळ्या करिक्युलर ऍक्टिव्हिटिज करण्यात जातो. मग ती गोळा केलेली माहिती पाठ करून  मुले परीक्षेत जशीच्या तशी  उत्तर लिहतात आणि भरघोस गुण मिळवतात. पण दुर्देवाने भरघोस गुण मिळवूनसुद्धा  व्यवहारज्ञान अभावी अपयशी होतात. आणि निराशेच्या गर्तेत कोसळतात. ह्या सगळ्यामध्ये मुलांचे बालपण हरवते. 

एखादे हसरे, निरागस मूल बघितल्यावर कुणालाही छान वाटते. ओळख नसूनही आपण त्याच्याकडे बघून हसतो, त्याचाशी बोलतो. बालपण ही निसर्गाची, ईश्वराची अनमोल देणगी आहे. म्हणून तर प्रत्येकाने  लहानसारखे असले पाहिजे, वागले पाहिजे. मोठ्यांनीही लहानांना मोठ्यांची लहान आवृत्ती न बनवता लहानांसारखंच राहू दिले पाहिजे. कारण एकदा गेलेले बालपण परत मिळत नाही.