मगोची समजूत काढण्यासाठी भाजप गडकरींची घेणार मदत

युती करून सहा जागा देण्याचा प्रस्ताव तयार


26th November 2021, 12:16 am
मगोची समजूत काढण्यासाठी भाजप गडकरींची घेणार मदत

फोटो : नितीन गडकरी
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : विधानसभा निवडणुकीत युती करून पेडणे, मये, मडकई, प्रियोळ, फोंडा आणि सावर्डे अशा सहा जागा मगोसाठी सोडण्याचा प्रस्ताव भाजपने तयार केला आहे. हा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामार्फत मगोचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांच्यासमोर मांडून त्यांना युतीसाठी तयार करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी गडकरी पुढील आठवड्यात गोव्यात येण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत मगोशिवाय पर्याय नसल्याचे दिसून आल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी युतीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनीही प्रयत्न चालवले आहेत. पण सर्वांचेच प्रयत्न अपयशी ठरत चालले आहेत. मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्याकडून युतीसाठी स्पष्ट नकारच मिळत आहे. त्यामुळे आता गडकरी-सुदिन यांच्यातील मैत्रिपूर्ण संबंधांचा वापर करून थेट गडकरी यांनाच सुदिन ढवळीकर यांच्याशी युतीबाबत चर्चा करण्यासाठी बसवण्याचे भाजपने निश्चित केले आहे. गडकरी यांनाही​ यासंदर्भातील माहिती देण्यात आली असून, गडकरी त्यासाठीच पुढील आठवड्यात गोव्यात येऊ शकतात, अशी माहिती भाजपातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
यावेळी मगोला पोषक वातावरण असल्याने पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी विधानसभेच्या १८ ते २१ जागा स्वतंत्रपणे लढवण्याचा विचार चालवला आहे. त्यांतील १२ जागांवरील उमेदवारही त्यांनी निश्चित केले आहेत. उर्वरित उमेदवार निश्चित करण्याचे काम पक्षाच्या केंद्रीय समितीकडून सुरू आहे. २०१७ मध्ये राज्यात भाजपचे सरकार घडवण्यात मगोने महत्त्वपूर्ण योगदान दिले. पण त्यानंतरच्या दोन वर्षांत भाजपने मगोचे दोन आमदार फोडत पक्षालाही सरकारमधून बाहेर काढले. त्याचा वचपा काढण्यासाठीच यावेळी कोणत्याही परिस्थितीत युती करून पुन्हा राजकीय आत्महत्या न करण्याचा निर्णय दीपक आणि सुदिन ढवळीकर बंधूंनी घेतला आहे. शिवाय युतीचा विचार पूर्णपणे बाजूला ठेवून स्वतंत्रपणे निवडणुकीस सामोरे जाण्याची तयारीही त्यांनी केली आहे.
...............................................................

कितीही जागा देऊ दे युती नाहीच : दीपक
भाजपने मगोसोबत अद्याप युतीबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही. शिवाय आम्ही भाजपसोबत युतीसाठी तयार नाही. भाजपने कितीही जागा देण्याची तयारी दाखवली तरी आम्ही यावेळी त्यांच्यासोबत जाणारच नाही. यावेळी मगो स्वबळावर निवडणूक लढवेल आणि समाधानकारक यश मिळवेल, असा विश्वास मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना व्यक्त केला.

हेही वाचा