सध्या तरी पर्यटनाला पर्याय नाही

करोना महामारीच्या विळख्यातून गोवा आता सावरू लागला आहे. सर्व व्यवहार सुरू झाल्याने हळूहळू अर्थव्यवस्था रूळावर येत आहे. खाण उद्योग बंद आहे. आयटी क्षेत्रालाही अद्याप गती मिळालेली नाही. ह्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासह रोजगार निर्मितीसाठी पर्यटनाचाच आधार घ्यावा लागेल.

Story: वेध । गणेश जावडेकर |
20th November 2021, 11:19 Hrs
सध्या तरी पर्यटनाला पर्याय नाही

गोवा म्हणजे निसर्गाला पडलेलं सुंदर स्वप्न. येथील फेसाळता समुद्र रेतीवर बसून पाहण्याचा आनंद घेण्यासाठी लाखो पर्यटक येतात. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांची तऱ्हाच इतर समुद्रकिनाऱ्यांपेक्षा वेगळी आहे. समुद्रकिनाऱ्यासह येथील मंदिरे, धबधबे हे सुद्धा पर्यटकांना भुरळ घालतात. तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर फेसाळते समुद्रकिनारे हीच गोव्याची ओळख बनलेली आहे. ग्रामीण भागात असलेली मंदिरे, धबधबे तसेच इतर नयनरम्य वास्तू जागतिक पर्यटन नकाशावर पोहचायला हव्यात. पर्यटन हा उद्योग म्हणून विकसित व्हायचा असेल, तर ह्या गोष्टी प्राधान्याने करायला हव्यात.

करोनामुळे गोव्यासह देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. आता ती हळूहळू सावरत असली तरी तिला आणखीन गती देण्याची गरज आहे. राज्यातली एकंदर स्थिती पाहिली तर सध्या तरी पर्यटन हाच एक आशेचा किरण दिसत आहे.

खाण उद्योग हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा होता. हा कणाच सध्या मोडला आहे. बेकायदा खाण व्यवसायामुळे २०१२ साली सर्वोच्च न्यायालयाने खाणबंदीचा आदेश दिला. यानंतर अजूनपर्यंत तरी हा व्यवसाय सावरलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर २०१५ साली हा व्यवसाय मर्यादित प्रमाणात सुरू झाला होता. पर्यावरणवाद्यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर हा उद्योग पुन्हा बंद झाला. तीन वर्षांचा काळ उलटून गेलेला असला तरी अजून हा व्यवसाय सुरू झालेला नाही. खाण बंदीमुळे गोवा सरकार कोट्यांनी रूपयांच्या कराला मुकलेला आहे. ह्या शिवाय हजारो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. ट्रक व्यवसाय, बार्ज व्यवसाय बंद आहेत. खाणव्याप्त भागातील गॅरेजीस, दुकाने, लहान हॉटेल्सचा व्यवसाय सुद्धा बुडालेला आहे. ह्या सर्वांसाठी पर्यायी रोजगार उपलब्ध करण्यात सरकारला यश आलेले नाही. खाण व्यवसाय पूर्ववत सुरू व्हावा, ह्यासाठी सरकारची धडपड सुरू आहे. ह्या धडपडीला सध्या तरी यश आलेले नाही. राज्यात बेरोजगारीची टक्केवारी वाढत आहे. संगणक अभियंते तसेच आयटी तंत्रज्ञांचा आकडा वाढत आहे. राज्यात नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्याने आयटी तंत्रज्ञ तसेच उच्चशिक्षित युवक नोकरीसाठी परराज्यात जात आहेत. करोना महामारीमुळे परराज्यात सुद्धा नोकरीच्या संधी मिळणे दुरापास्त झाले आहे. करोना महामारीचा फटका केवळ गोव्यालाच बसलेला नाही, तर तो संपूर्ण जगाला बसलेला आहे.

ह्या कठीण परिस्थितून मार्ग काढण्याचे सर्वांसमोर आव्हान आहे. करोनाचे प्रमाण कमी झालेले आहे. बहुतांशी लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्याने बरेच जण करोनापासून सुरक्षित झालेले आहेत. शैक्षणिक वर्ग सोडले तर सर्व व्यवसाय सुरू झालेले आहेत. ह्याचा परिणाम म्हणून हळूहळू पर्यटकांचा आकडा वाढत आहे. ह्या संधीचा सरकार तसेच जनतेने लाभ घ्यायला हवा. करोनापासून गोवा हे सुरक्षित राज्य आहे, हा संदेश जगभरात पोचवायला हवा. यासाठी विदेशातल्या जनसंपर्क कंपन्यांची मदत घ्यायला हवी. आंतरराष्ट्रीय पर्यटकांपेक्षा गोव्याला बहुतांशी देशी पर्यटक भेट देतात. तरीही देशी पर्यटकांच्या तुलनेत विदेशी पर्यटक जास्त पैसे खर्च करतात. याकरिता विदेशी पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. देशी पर्यटकांपेक्षा विदेशी पर्यटक पंचतारांकित हॉटेलात दीर्घ काळ वास्तव्य करतात. शिवाय खासगी टॅक्सीने त्यांची ये जा सुरू असते. ह्यामुळे हॉटेलसह टॅक्सीवाल्यांनाही व्यवसाय मिळतो. पंचतारांकित हॉटेल्स, टॅक्सी, समुद्रकिनाऱ्यावरील शॅक्स हे सर्व व्यवसाय पर्यटनावर अवलंबून आहेत. करोना काळात जेव्हा पर्यटक नव्हते, तेव्हा हे सर्व व्यवसाय ठप्प होते. जुने गोवे येथील चर्च परिसरात ज्यादा तर विदेशी पर्यटकांचेच दर्शन घडते. यामुळे चर्च परिसरात जी लहानमोठी हॉटेल्स आहेत, टॅक्सी आहेत, त्यांचा व्यवसाय बहुतांशी विदेशी पर्यटकांवर अवलंबून असतो.

मिरामार, कळंगुट येथील समुद्रकिनारे, जुने गोवे चर्च, दुधसागर धबधबा याचे विदेशी पर्यटकांना आकर्षण आहे. तरीही निसर्गाने नटलेल्या गोव्याचे पर्यटन हे समुद्रकिनारे किंवा चर्च पुरते राहता कामा नये. अन्य वास्तुंची वा स्थळांची जाहिरात व्हायला हवी. हरवळे येथील धबधब्यावर वीसेक वर्षांपूर्वी बरेच पर्यटक जायचे. पण हल्ली पूर्वी इतकी पर्यटकांची वाहने धबधबा परिसरात दिसत नाहीत. करोना महामारी हे यामागील एक कारण आहे. तरीही २००० च्या दशकात  हरवळे धबधब्यावर पर्यटकांची जशी वर्दळ असायची, तशी २०१५ नंतर दिसत नाही. हरवळे धबधबा परिसराचा आणखीन विकास होण्याची गरज आहे. अंत्रुज महालातील मंदिरे आणि तिथे होणारे उत्सव यांचे वैशिष्ट्य वेगळेच आहे. हे वैशिष्ट्य जागतिक नकाशावर पोहचायला हवे. बोंडला अभयारण्यात १९९० व त्यापूर्वी जेवढे प्राणी होते, तेवढे प्राणी आज नाहीत. बोंडला अभयारण्य पर्यटनदृष्ट्या आणखीन आकर्षक करण्यास बराच वाव आहे. पर्यटनाच्या विकासासाठी बऱ्याच घोषणा होतात. निधीसुद्धा जाहीर होतो. तरीही मागच्या दहा वर्षात किती पर्यटनस्थळांचा विकास झालेला आहे? किती नवीन पर्यटनस्थळे निर्माण झालेली आहेत? पर्यटन हा राज्याचा एक मुख्य व्यवसाय आहे. तरी या क्षेत्राचा विकास करण्यासाठी वा रोजगाराच्या संधी तयार करण्यासाठी नवीन पर्यटनस्थळांचा शोध घ्यायला हवा. समुद्रकिनारे तसेच इतर पर्यटनस्थळांवर मूलभूत सुविधांचीही उणीव आहे. मूलभूत सुविधांची निर्मिती करताना पर्यटनस्थळे अधिकाधिक रमणीय करण्यावर भर असायला हवा. पर्यटकच नव्हे तरी राज्यातील युवक व ज्येष्ठ नागरिकसुद्धा या पर्यटन स्थळांचा आनंद घेऊ शकतील.