स्वयं सहाय्य गटामुळे स्वयंसिद्धा झालेली मंदा गावस

स्वयं सहाय्य गटात काम करताना आत्मविश्वास, आत्मनिर्भरता या गोष्टी आत्मसात केल्या असे मंदा अभिमानाने सांगते.

Story: स्वयंपूर्णा । प्रीती केरकर |
20th November 2021, 12:06 am
स्वयं सहाय्य गटामुळे स्वयंसिद्धा झालेली मंदा गावस

‘सदनिका' स्वयं सहाय्य गटाची  सभासद मंदा गावस गेली कित्येक वर्षे  केरी, सत्तरी इथल्या बचत गटात आहे. बचत गटाचे महत्त्व तिला तिच्या लग्नापूर्वीच माहीत होते कारण ती मूळ माशेल-तिवरे येथील आणि तिचे लग्न वाळपई-सत्तरी येथील उत्तम गावस यांच्यासोबत १९९७ साली झाले. तेव्हा तिचे पती "सेझा गोवा"(sesa Goa) मध्ये कार्यरत होते. तब्बल दहा वर्षांचा  कालावधी उलटल्यानंतर तिने २००७ साली केरी येथे 'स्वर्णजयंती ग्रामीण स्वयंरोजगार'  (SGSY) या योजनेअंतर्गत "सदनिका" नावाच्या स्वयं सहाय्य गटाची स्थापना (TA) शिला माजीक (सेवा निवृत्त) यांच्या नेतृत्वाखाली केली.

मंदाला आधीपासूनच गटाची थोडीफार माहिती तर होतीच, पण आता स्वत:चा गट झाल्यामुळे आणखीनच कुतूहल वाढले. नवीन नवीन गोष्टी शिकायला तिला लहानपणापासूनच आवडायचं. घरात सगळ्यात लहान असल्यामुळे भावाची तसेच बहिणीची लाडकी असल्याने काही मागायच्या आधीच तिला सर्व मिळत असे. दहावीचे तिचे शिक्षण झाल्यानंतर तिने शिवण वर्गास जाण्यास सुरुवात केली. त्यावेळेला तिथल्या अनेक महिलांना आणि मुलींना तिथले बचत गट शिवणकाम, भरतकाम, विणकामाच्या ऑर्डर्स देत. केरी, सत्तरी येथे आल्यानंतर तिने स्वतःच्या गटाबरोबरच इतर सेल्फ हेल्प गट स्थापन केले. गटाचे महत्त्व व त्याचे कार्य तसेच गटाची मदत वेळोवेळी आपल्याला कशी होते त्याबद्दलचे ज्ञान ती त्यांना देते. त्यांना गटाची कार्यपद्धती पटवून देई.

डी.आर.डी.ए. च्या जी.एस.आर.एल.एम. या "स्त्री शक्ती"योजनेअंतर्गत तिचा ग्रुप जोडण्यात आला आणि ती तिथली बी.आर.पी. म्हणून निवडण्यात आली. जवळजवळ ३२ हून अधिक सेल्फ हेल्प ग्रुप तिने (TA) वसुंधरा राणे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केले. तसेच दोन ग्रामसंघ "सखी "व "प्रेरणा"  स्थापित केले. अंगणवाडीच्या सहाय्याने 'स्वावलंबी' योजनेअंतर्गत तिने पाककलेचे प्रशिक्षण वर्ग घेतले. त्यातूनच तिने आपल्या कॅटरिंग व्यवसायाला सुरुवात केली. विविध विभागातील योजनेचा लाभ तिने आपल्या बचत गटांना दिलेला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र वाळपई तर्फे घेण्यात येणारा "पोषण आहार" तसेच आरोग्यविषयक कार्यक्रम किंवा कार्यशाळेस ती आपण होऊन सर्व महिलांना एकत्र करून, त्यांच्याबरोबर लहान मुलांना जातीने सहभागी करून घेते . केरी गावातील सेल्फ हेल्प ग्रुपमधील महिलांना विविध प्रकारच्या कार्यामध्ये तसेच वेगवेगळ्या उपक्रमात व्यस्त ठेवत असते. केरी पंचायतीत सेल्फ हेल्प ग्रुपच्या महिलांसाठी एखादा कार्यक्रम असल्यास किंवा ग्रामसभा असल्यास सर्व महिलांना प्रोत्साहन देऊन कार्यक्रमास हजर राहण्यास ती सांगते .

सेल्फ हेल्प ग्रुपमधून कर्ज मिळते म्हणून ग्रुप करू नये, तर इतर खूप अशा सवलती मिळतात. स्वयं सहाय्य गटात काम करताना आत्मविश्वास, आत्मनिर्भरता या गोष्टी आपण शिकलो असे मंदा अभिमानाने सांगते.

(जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डी. आर. डी. ए.) यांच्या सौजन्याने.)