पर्यटकांची फसवणूक : बनावट हॉटेल बुकिंग एजंटला अटक

|
26th October 2021, 12:12 Hrs
पर्यटकांची फसवणूक : बनावट हॉटेल बुकिंग एजंटला अटक

फसवणूक प्रकरणी अटक केलेल्या संशयितासह कळंगुट पोलीस.      

प्रतिनिधी । गोवन वार्ता      

म्हापसा : हैदराबादमधील फिर्यादी पर्यटकाचे अनधिकृत हॉटेल बुकिंग घेऊन त्यांना १८ हजारांना गंडा घातल्याच्या आरोपाखाली कळंगुट पोलिसांनी श्रीवन प्रसाद (२७, तिवायवाडा - कळंगुट व मूळ आंध्रप्रदेश) यास अटक केली.      

फिर्यादी प्रनीश दिब्बिडी (हैदराबाद) यांनी कळंगुट येथे पर्यटनाला येण्यासाठी संशयित श्रीवण याच्याकडे दोन दिवसांसाठी हॉटेल बुकिंग केले होते. त्यासाठी त्यांनी १८ हजार रुपये संशयितांच्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा केले होते.      

संशयित आरोपी हा अनधिकृत हॉटेल बुकिंग एजंट आहे. फिर्यादी आपल्या कुटुंबियांसोबत १४ ऑक्टोबर रोजी गोव्यात दाखल होताच संशयिताने नाव दिलेल्या हॉटेलमध्ये त्यांचे बुकिंग करण्यात आले नव्हते. शिवाय संशयित फोनही उचलत नव्हता.      

याबाबत फिर्यादीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर संशयित आरोपीस पोलिसांनी २३ रोजी पकडून अटक केली. संशयित आरोपीस तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.