भाजपच्या दिल्लीतील नेत्यांकडून निवडणूक तयारीचा आढावा

मुख्यमंत्री डॉ. सावंत, तानावडे यांच्याशी दिल्लीत बैठक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
22nd October 2021, 11:42 Hrs
भाजपच्या दिल्लीतील नेत्यांकडून निवडणूक तयारीचा आढावा

पणजी : भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष, गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, सहप्रभारी दर्शना जरदोष यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व संघटनमंत्री सतीश धोंड यांच्याशी दिल्लीत बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेतला. तसेच पुढील रणनितीबाबतही चर्चा केली.
भाजपाध्यक्ष नड्डा, अमित शहा तसेच बी. एल. संतोष यांनी विधानसभेच्या निवडणुका होत असलेल्या गोव्यासह पाचही राज्यांच्या मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व संघटनमंत्र्यांना दिल्लीत बोलावून त्यांच्याशी निवडणुकांसंदर्भात चर्चा केली. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री, तानावडे आणि धोंड यांना दिल्लीत बोलावण्यात आले होते.
दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात सुरू असलेल्या ‘आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा’, ‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमांची माहिती दिली. तसेच प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी भाजपकडून निवडणुकीबाबत सुरू असलेल्या तयारीची माहिती ज्येष्ठ नेत्यांना दिली. विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जात असताना आखण्यात येत असलेल्या रणनीतीवरही यावेळी चर्चा करण्यात आली. पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश केंद्रीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसह इतर दोन्ही नेत्यांना दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी गोव्याला येऊन प्रचाराचे रणशिंग फुंकले होते. आता दिल्लीतही बैठक झाल्याने राज्यात आगामी काळात घडामोडींना वेग येणार आहे.

राज्य विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानेच शुक्रवारी दिल्लीत बैठक झाली. यावेळी निवडणुकीच्या रणनीतीवरही चर्चा करण्यात आली. यानंतरच्या काळातही भाजपकडून अशा बैठकांचे आयोजन होत राहील. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री