अग्रलेख । गोंधळ दूर होतोय

पर्याय खूप आहेत, पण पुढचे राजकीय भवितव्य काय असाही प्रश्न अनेक आमदारांना पडला आहे. ही सगळी स्थिती निर्माण झाली आहे ती तृणमूल काँग्रेसच्या प्रवेशामुळे.

Story: अग्रलेख |
15th October 2021, 01:02 Hrs
अग्रलेख । गोंधळ दूर होतोय

गोव्याच्या राजकारणात तृणमूल काँग्रेसने प्रवेश केल्यानंतर गोंधळलेले काही आमदार आता हळूहळू गोंधळाच्या स्थितीतून बाहेर येत आहेत. त्याची सुरुवात सांगेचे आमदार प्रसाद गांवकर यांच्याकडून झाली आहे. प्रसाद गांवकर हे अपक्ष म्हणून निवडून आले. पण त्यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गावकर यांना आमदार जमलेल्या ठिकाणी यायला उशीर झालाचे थातूरमातूर कारण देत प्रसाद गावकर यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले. गोविंद गावडे यांना मंत्री करण्याचे निश्चित झाल्यामुळे प्रसाद गावकर यांची निराशा झाली. त्यानंतर झालेल्या राजकारणात गावकर यांना वन विकास महामंडळ जे अत्यंत दुर्लक्षित महामंडळ आहे, त्याचे अध्यक्षपद दिले गेले. पण काही काळानंतर गावकर यांनी ते पद स्वाभीमानाने सोडले. गावकर हे नवे आणि तरूण आमदार. पण आपला स्वाभिमान त्यांनी जागा ठेवला. ज्यांना आपली किंमत नाही, त्यांच्यासोबत राहण्यापेक्षा महामंडळच सोडणे योग्य असे जाहीर करत त्यांनी पद सोडले. त्यानंतर विरोधात राहून त्यांनी आपले प्रश्न मांडले. सांगेत भाजपच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे दोन गट आहेत, त्यात गावकर हे अपक्ष असल्यामुळे त्यांची स्थानिक पातळीवरही अडवणूक करण्याचा प्रयत्न भाजपच्या लोकांकडून सातत्याने होत असतो. अशा वेळी भाजपात संधी नाही हे हेरून त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याच्या विचार केला. आपल्या बंधूसहीत इतर कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये पाठवले. पण त्यानंतर लुईझीन फालेरो यांनी काँग्रेस फोडून तृणमूल काँग्रेसला गोव्यात आणला. प्रसाद गांवकर यांच्यासह काही आमदार जे काँग्रेसमध्ये जाणार होते ते ह्या घडामोडीमुळे गोंधळले.
काँग्रेसला निवडणुकीत संधी आहे असे स्पष्ट दिसत असताना फालेरो यांनी काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसल्यामुळे काँग्रेस व्याकूळ स्थितीत आली. काँग्रेससोबत जाणे जोखमीचे ठरू शकते असे वाटू लागल्यामुळे गोंधळलेल्या काही आमदारांपैकी प्रसाद गावकर यांनी अखेर आपला निर्णय घेतला. त्यांच्यासारख्या आधीच परिस्थितीमध्ये होरपळून निघालेल्या आमदाराने काँग्रेससोबत जाण्याचा विचार बदलणे स्वाभाविक आहे. म्हणूनच त्यांनी आता तृणमूल काँग्रेसची कास धरली आहे. ही स्थिती फक्त एकट्या प्रसाद गांवकर यांची नाही. गेल्या पाच वर्षात म्हणावी तशी कामे न झाल्यामुळे अनेक आमदारांची स्थिती बिकट झाली आहे. सरकारकडून दुखावलेले काही आमदार पक्ष बदलाच्या तयारीत होते. काहीजण तर काँग्रेसमध्ये जाण्याच्या पूर्ण तयारीत असताना तृणमूलने प्रवेश करून आमदारांच्या मनात गोंधळ निर्माण केला. त्यामुळे अनेक आमदार सध्या थांबा आणि पाहा असा स्थितीत आहेत. काही आमदार काय घडते त्याकडे लक्ष ठेवून आहेत. मतदारसंघात स्थिती चांगली असलेल्या आमदारांना चांगला 'राजकीय भाव' आला आहे. काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नाही तर आम आदमी पक्ष आहे. त्यांच्याकडून नाही तर तृणमूल आहे. पर्याय खूप आहेत पण पुढचे राजकीय भवितव्य काय असाही प्रश्न अनेक आमदारांना पडला आहे. ही सगळी स्थिती निर्माण झाली आहे ती तृणमूल काँग्रेसच्या प्रवेशामुळे. पण त्यातही प्रसाद गावकर यांनी आपला मार्ग लवकर निवडला आहे.
भाजप आणि मगो पुन्हा युती करण्याच्या विचारात आहेत. भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी मगोला युतीची दारे खुली आहेत असे स्पष्ट केल्यामुळे ह्या दोघांमध्ये युती होऊही शकते. विरोधी गटातील पक्ष मात्र सध्या एकमेकांसोबत जाण्याच्या स्थितीत नाहीत. अजूनही त्यांची चर्चा योग्य मार्गी लागलेली नाही. गोव्यातील ही एकूणच स्थिती पाहता प्रसाद गांवकर यांनी जो मार्ग स्वीकारला आहे, तो त्यांच्यासाठी फायद्याचाच आहे. कारण भाजपकडे जागा नाही आणि काँग्रेसचे काही खरे नाही, अशा वेळी मागण्या पूर्ण करणारा कुठलाही प्रबळ राजकीय पक्ष पाठीशी उभा राहत असेल तर अशा पक्षासोबत जाण्याचा त्यांनी जसा निर्णय घेतला आहे; तीच वेळ अन्य काही आमदारांवर येणार आहे. आलेक्स रेजिनाल्ड यांनी आम आदमी पक्षाकडे तात्पुरती पाठ फिरवली असली तरी पुढील काही दिवसांत गोव्यात खूप घडामोडी होऊ शकतात. अपक्ष आमदार रोहन खंवटे, जयेश साळगांवकार हेही एखाद्या पक्षाचा पर्याय स्वीकारू शकतात. तृणमूलच्या प्रवेशानंतर गेले काही दिवस गोव्यातील राजकारणात जी अस्वस्थता होती आणि जो गोंधळ होता तो आता हळूहळू दूर होत आहे, असेच प्रसाद गांवकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे दिसत आहे. पण खरोखरच हा गोंधळ दूर झाला आहे की अजूनही काही आमदारांना दिशा सापडत नाही ते येणारा काळ सांगेल.