जामीन फेटाळला; पण वेळेत खटला न संपल्यास पुन्हा अर्ज करण्यास संशयितांना न्यायालयाकडून मुभा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
15th October 2021, 12:30 am
जामीन फेटाळला; पण वेळेत खटला न संपल्यास पुन्हा अर्ज करण्यास संशयितांना न्यायालयाकडून मुभा

पणजी : राज्यात २०१३ साली गाजलेला ताळगाव येथील हसन खान खून प्रकरणातील मुख्य संशयित रॉबर्ट गोन्साल्वीस आणि अभिनंदन पटेल या दोघांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. दरम्यान या प्रकरणाच्या खटला ३१ डिसेंबर २०२१ रोजी पूर्वी समाप्त करण्याचा निर्देश खंडपीठाने दिला होता. या खटला समाप्त न केल्यास संशयितांना जामीन अर्ज दाखल करण्याची मुभा खंडपीठाने दिली आहे.

ताळगाव येथील हसन खान यांचा दि. २२ मार्च २०१३ रोजी खून करण्यात आला होता. खान यांचा मृतदेह बांबोळी येथे त्यांच्या कारमध्ये सापडला होता. या प्रकरणी आगशी पोलिसांनी भादंसंचे कलम २०१, ३०२, ३९७ आणि १२० बी आणि इतर कलमाखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी खाण खात्याचे माजी कर्मचारी रॉबर्ट गोन्साल्वीस, अभिनंदन पटेल, अनिल भुये, रवी पाटील, शिवाजी पाटील आणि अनिकेत याल्लुरकर या संशयितांना अटक केली. या प्रकरणी आगशी पोलिसांनी सर्व संशयितांविरोधात २०१३ साली पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयात ७४० पानी आरोपपत्र दाखल केले. त्यात पोलिसांनी ७८ जणांची साक्ष नोंदवली.