थॉमस चषक स्पर्धेत भारताची नेदरलँडवर मात


12th October 2021, 12:00 am
थॉमस चषक स्पर्धेत भारताची नेदरलँडवर मात

आरहस : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने थॉमस चषकाच्या अंतिम सामन्यात नेदरलँडला त्यांच्या गट ‘सी’च्या सामन्यात ५-० ने पराभूत करून शानदार सुरुवात केली. रविवारी उशिरा रात्री खेळलेल्या सामन्यात किदांबी श्रीकांतने पुरुष एकेरीच्या सामन्यात जोरान क्विकेलचा २१-१२, २१-१४ असा पराभव करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दुहेरी जोडीने नंतर रुबेन जिल आणि टिस व्हॅन डेर लेकचा २१-१९, २१-१२ असा पराभव करून भारताने २-० असे क्लीन स्विप दिले.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता बी साई प्रणीतने दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात रॉबिन मेसमॅनला २१-४, २१-१२ असे हरवून भारताला ३-० अशी निर्विवाद आघाडी मिळवून दिली. एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिलाने दुसऱ्या दुहेरी सामन्यात अँडी बुइसिक आणि ब्रायन वासिंकचा २१-१२, २१-१३ असा पराभव केला तर समीर वर्माने तिसऱ्या आणि अंतिम एकेरी सामन्यात गिज ड्यूट्झचा २१-६, २१-११ असा पराभव करून भारताला क्लीन स्वीप मिळवून दिला.
याआधी रविवारी उबेर कपच्या अंतिम सामन्यात स्टार शटलर सायना नेहवालला सामना मधूनच सोडावा लागला पण भारताच्या युवा महिला संघाने चांगली कामगिरी करत स्पेनवर ३-२ असा विजय नोंदवला. भारताचा पुरुष संघ मंगळवारी थॉमस चषकात कमकुवत ताहिती संघाचा सामना करेल, तर महिला संघ उबेर चषक गट ‘ब’ मध्ये स्कॉटलंडशी लढेल.