मंत्री लोबोंकडून उघड; कार्यालयात बसून लोकांची कामे होत नसल्याची टीका

फोटो : मायकल लोबो
प्रतिनिधी। गोवन वार्ता                  
पणजी : मंत्री मायकल लोबो आणि दीपक प्रभू पाऊस्कर यांच्यात सोमवारी झालेल्या भांडणाचे कारण रस्त्यांची बिकट अवस्था आणि पाणी हेच असल्याचे खुद्द लोबो यांनीच बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंत्री पाऊस्कर आपल्या खात्यांना योग्य न्याय देत नसतील तर त्यांना मंत्री करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाऊस्करांबाबत योग्य निर्णय घ्यावा लागेल, असेही लोबो म्हणाले.            
स्वत:ला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत जाब जनता मंत्र्यांना नव्हे, तर स्थानिक आमदार आणि पंचांना विचारत असते. त्यामुळे आमदार म्हणून मला संबंधित मंत्र्यांशी यावरून वाद घालण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यानुसारच आपण सोमवारी सार्वजनिक बांंधकाम मंत्री दीपक पाऊस्कर यांना जाब विचारला. पाऊस्कर यांच्याशी आपले मतभेद नाहीत. पण, मतदारसंघातील लोकांचे प्रश्न त्यांचा प्रतिनिधी म्हणून मंत्र्यांसमोर उपस्थित करणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.              
गोमंतकीयांना चांगले रस्ते आणि पुरेसे पाणी देण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांचीच आहे. जनतेला या गोष्टी मिळत नसतील तर त्याला सर्वस्वी मंत्री पाऊस्करच जबाबदार आहेत. ही जबाबदारी स्वीकारून त्यांनी काम करणे गरजेचे आहे. मंत्री, आमदारांनी कार्यालयात बसून कामे होत नसतात. त्यांनी आपल्या खात्यांच्या अधिकाऱ्यांना कामाला लावून, स्वत: प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन कामे पूर्णत्वास न्यायची असतात, असा टोला त्यांनी लगावला. रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. त्याचा मोठा फटका नागरिक, वाहन चालकांना बसत आहे. त्यामुळे जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे, असेही मंत्री लोबो यांनी नमूद केले.
............................................            
काहींचे पत्ते कट होऊ शकतात!            
येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यापूर्वी भाजप सर्व्हे करेल. विजयाची क्षमता असलेल्यांनाच उमेदवारी देईल, असे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जाहीर केले. याबाबत मंत्री लोबो यांना विचारले असता, पक्षाने घेतलेला निर्णय योग्यच आहे. विजयाची क्षमता लक्षात घेऊन उमेदवारी दिल्यास विद्यमान २७ पैकी काहींचे पत्ते कट होऊ शकतात, असा दावाही मंत्री मायकल लोबो यांनी केला.            
.............................................            
पर्यटकांची सतावणूक करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा!            
- मंत्री मायकल लोबो यांनी बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन मोफत डिजिटल मीटर तत्काळ बसविण्याची, तसेच पैशांसाठी पर्यटकांची लूट करणाऱ्या किनारी भागांतील वाहतूक पोलिसांचे तत्काळ निलंबन करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.            
- पर्यटन व्यवसायाला गती मिळण्यासाठी अधिकाधिक पर्यटक गोव्यात येणे महत्त्वाचे आहे. काही वाहतूक पोलीस पैशांसाठी नियमांचे उल्लंघन न करणाऱ्या पर्यटकांनाही थांबवून त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर अवश्य कारवाई झाली पाहिजे. पण, इतरांना थांबवून त्यांच्याकडे कागदपत्रे मागण्याचा पोलिसांना अधिकार नाही, असे मंत्री लोबो म्हणाले.