गृहआधारचे पैसे लवकरच मिळतील

संचालक दीपाली नाईक यांचे पर्वरीतील महिलांना आश्वासन


22nd September 2021, 11:31 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी :
महिला आणि बाल कल्याण विकास खात्याअंतर्गत दिल्या जाणाऱ्या गृहआधार योजनेचे पैसे पर्वरीतील काही महिलांना मिळणे बंद झाल्याने या महिलांनी बुधवारी खात्याच्या संचालिका दीपाली नाईक यांची भेट घेऊन विचारणा केली. दीपाली नाईक यांनी खात्याअंतर्गत प्रक्रिया सुरू असून लवकरच सर्वांना त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत, असे अश्वासन त्या महिलांना दिले.
पर्वरी येथील महिला गटाच्या महिलांना गृहआधार योजनेचे पैसे गेल्या काही महिन्यांपासून मिळालेले नाहीत. आता करोनाच्या काळात जर आमचे पैसे मिळत नसतील तर या योजनेचा फायदा काय, अशी विचारणाही यावेळी त्या महिलांनी केली. आम्ही दोन तास या ठिकाणी संचालकांचा भेटीसाठी उभ्या होतो. या ठिकाणी पोलीस तैनात केले होते. भेट झाल्यावर दीपाली नाईक यांनी आम्हाला ३० सप्टेंबरपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार, असे सांगितले. जर पैसे जमा झाले नाही तर आम्हाला पुन्हा खात्यासमोर येऊन बसावे लागेल, असा इशाराही यावेळी त्या पर्वरीतील महिलांनी दिला.
महिला आणि बाल कल्याण खात्याच्या गृहआधार योजनेची राज्यातील अंगणवाडी शिक्षिका सर्वे करत आहेत. काही जणांचे चुकीचे अकाऊंट आहेत, त्याची पाहणी केली जात आहे. ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांना लवकरच गृहआधारचा लाभ मिळणार आहे, असे दीपाली नाईक यांनी सांगितले.
सर्वे करणाऱ्यांना सहकार्य करा
‘गेल’तर्फे आणि अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांमार्फत गृहआधारच्या लाभार्थींचा सर्वे केला जातो. काही लोक सर्वे करण्यासाठी आलेल्या लोकांना योग्य माहिती देत नाहीत, त्यांना योग्य सहकार्य करत नाहीत. यामुळे काही लोकांचा योग्य सर्वे होत नाही. लोकांनी सर्वे करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगली वागणूक द्यावी. आम्ही खात्यांतर्गत याची पाहणी सुरू केली असून ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना लवकरच ते मिळणार आहेत, असे यावेळी महिला बाल कल्याण खात्याच्या संचालिका दीपाली नाईक यांनी सांगितले.