अग्रलेख । फडणवीसांसमोर आव्हानांचा डोंगर

निवडणुकीच्या तयारीला जोर चढलेला असताना मंत्री आमदारांमध्येच जुंपणे यावरून सर्वसामान्य माणसाला नोकरी मिळवण्यासाठी कुठली अग्निपरीक्षा द्यावी लागते त्याची कल्पना येते.

Story: अग्रलेख |
22nd September 2021, 12:12 am
अग्रलेख । फडणवीसांसमोर आव्हानांचा डोंगर

महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्त केल्यामुळे गोव्यातील भाजपमध्ये उत्साह वाढला असे दिसत असले तरी फडणवीस यांच्यासमोर गोव्यातील भाजपमधील मतभेद, बंडाळी रोखण्याचे मोठे आव्हान आहे. स्थानिक भाजपमध्ये असलेले मतभेद फडणवीस यांच्या लक्षात आले आहेत. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे बोट दाखवून हा विषय तुर्तास वेगळा केला असला तरीही पुढील काही महिने भाजपमधील बंडखोरांचेच खरे दुखणे भाजपला सोसावे लागणार आहे.
भाजपमधील अंतर्गत बंडाळी रोखण्यात फडणवीस यशस्वी होतील का ते पाहण्यासारखे आहे. निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी दिल्यानंतर फडणवीस यांनी पहिला गोवा दौरा केला. त्यात त्यांना पक्षातील असंतोषच जास्त दिसला. मंत्री, आमदारांना स्वतंत्रपणे भेटले, पण त्यातही एकमेकाविरोधातील द्वेष त्यांना पहावा लागला. त्यामुळे, भाजपचीच मोट बांधण्यावर भर द्यावा लागेल असे फडणवीस यांना वाटत असावे त्याच मुळे २०२२ च्या निवडणुकीत कुठल्याच पक्षाला कमी न लेखता निवणडणूक लढण्याचा त्यांचा निर्धार हा खऱ्या मुरलेल्या राजकारण्याचा स्वभाव प्रदर्शित करतो. कुठल्याच पक्षाला कमी न समजता पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीला सामोरे जाण्याचा उपदेश त्यांनी स्थानिक भाजप नेत्यांना केला आहे. जाताना गोव्यात २०२२ च्या निवडणुकीनंतर भाजपमध्ये कोणाला घेण्याची आवश्यकता भासणार नाही असे सांगून आता जे भाजपसोबत नाहीत त्यांनाही अप्रत्यक्षपणे बाहेर ठेवण्याचा इशारा दिला. त्यांचा रोख मगोवर आहे असेच समजावे लागेल. त्यांनी इतरांना इशारा दिला खरा पण, त्यांच्या पहिल्याच दौऱ्यात भाजपमधील आमदार मंत्र्यांमध्ये असलेले मतभेदही काही प्रमाणात उघड झाले. मंत्री, आमदारांनी एकमेकाविरोधात केलेल्या तक्रारीवरून गोव्यात अनेक ठिकाणी पक्षांतर्गत बंडाळी दिसू शकते असा अंदाज त्यांनाही आला असेल. त्यामुळेच उमेदवारी वाटप, युती असे निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घ्यावेत असे म्हणून आपली जबाबदारी त्यांनी मर्यादित केली आहे, कारण उद्या कुठल्याच बंडखोरीला फडणवीस जबाबदार नसतील असा त्याचा अर्थ काढावा लागेल. पण त्यांनी असे बोलून दाखवले असले तरीही निवडणूक प्रभारी म्हणून फडणवीस यांनाच ही बंडाळी मोडून काढावी लागेल हेही तेवढेच खरे.
एक आश्चर्याची बाब ह्या दौऱ्यातून समोर आली ती म्हणजे भाजपजवळ सध्या २७ आमदार आहेत, पण हे २७ आमदार जिंकण्याची शक्यता भाजलाही वाटत नाही. फडणवीस यांनी २०२२ मध्ये २२ जागा मिळवण्याचा निर्धार करण्याचा आदेश भाजपच्या मंत्री, आमदारांना दिला आहे, त्यामुळे विद्यमान आमदारांपैकी २०२२ मध्ये काहीजण पराभूत होतील किंवा काहींना उमेदवारीच मिळणार नाही असा त्यांचा निष्कर्ष असावा. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही २०२२ मध्ये भाजपचे २२ आमदार असतील आणि त्यात आपण असणार असे सांगितले आहे. याचाच अर्थ भाजपला सध्याच्या २७ आमदारांचा आकडा कमी झालेला आताच दिसत आहे. खरे म्हणजे भाजपला जिंकण्याचा एवढा आत्मविश्वास आहे तर किमान ३० जागा भाजपला मिळतील असा दावा त्यांच्याकडून येणे अपेक्षित होते, पण असलेलेच आपले आमदार कमी होतील असे भाजप सांगत असल्यामुळे निवडणुकीपूर्वीच कार्यकर्त्यांचे आणि आमदारांचे नैतिकदृष्ट्या खच्चीकरण करण्याचाच हा प्रकार आहे.
सर्व मंत्री आमदारांना फडणवीस एकदा एकत्र भेटले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे भेटले. एकत्र भेटण्याच्या जागी जमलेल्या मंत्री आमदारांपैकी काहींचे भांडण लागले. फक्त तोंडी बाचाबाची नाही तर ते हातघाईपर्यंत आले. भाजपमध्ये हा प्रकार आता नवा नाही. यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीतच दोनवेळा मंत्र्यांनी एकमेकाला शिव्या देणे आणि मुठी आवळण्याचे प्रकार जाहीर आहेत. तसेच प्रकार फडणवीस यांना भेटण्यापूर्वी आमदारांमध्ये घडले. एका मंत्र्याने तर दुसऱ्या मंत्र्याला यथेच्छ शिव्या दिल्या. अन्य एका मंत्र्याने हस्तक्षप करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या एका आमदाराने तर एका मंत्र्याचा पाणउताराच केला. बदल्या आणि नोकऱ्यांसाठी पैसे घेण्याचा हा वाद होता. पण फडणवीस यांनी मंत्री आमदारांमधील वाद हा प्रशासकीय आहे असे म्हणत तो वाद गांभीर्याने घेतला नाहीत. निवडणूक तोंडावर असताना आणि निवडणुकीच्या तयारीला जोर चढलेला असताना अशा पद्धतीने मंत्री आमदारांमध्येच जुंपणे यावरून सर्वसामान्य माणसाला नोकरी मिळवण्यासाठी कुठली अग्निपरीक्षा द्यावी लागते त्याची कल्पना येते. फडणवीस यांनी त्यांच्या पहिल्याच दौऱ्यात असा अनुभव आल्यामुळे त्यांच्यासमोर पक्षातील हे वाद मिटवण्याचे आव्हानही आहेच.