होंडा येथे खांबाला ट्रक धडकून वीज खंडित

|
20th September 2021, 11:23 Hrs
होंडा येथे खांबाला ट्रक धडकून वीज खंडित

अवजड ट्रकची धडक बसून कोसळलेला विजेचा खांब.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वाळपई :
होंडा येथे सोमवारी दुपारी अवजड वाहनाने विजेच्या खांबाला धडक दिल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून वीजवाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. होंडा भागातून अवजड वाहतुकीला बंदी घातलेली असतानाही अवजड ट्रक या भागातून नेहमी ये - जा करतात. या भागातील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार या भागांमध्ये अशा प्रकारच्या वाहतुकीला बंदी आहे. असे असतानाही सातत्याने या भागातून अनेक प्रकारची वाहतूक होत असल्यामुळे नागरिकांना धोका निर्माण झालेला आहे. सोमवारी सकाळी अवजड ट्रक होंडा भागातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विजेच्या खांबाला धडकल्यामुळे वीज वाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे सकाळी १० वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला होता.
या परिसरात सातत्याने नागरिकांची वर्दळ सुरूच असते. नागरिकांनी प्रसंगावधान राखून याबाबतची माहिती ताबडतोब वीज यंत्रणेला दिल्यानंतर वीजपुरवठा बंद करण्यात आला.
दरम्यान, या भागातील नागरिकांनी विजेचे खांब पूर्णपणे नादुरुस्त झाले असून ते बदलण्याची मागणी अनेकदा करण्यात आली, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.