अमली पदार्थ : नायजेरीयनला ५ वर्षे सश्रम कारावास

|
20th September 2021, 11:06 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी :
अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी मन्डे फेलिक्स ओडेडे या नायजेरियन नागरिकाला पाच वर्षांची सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. याबाबतचा निवाडा उत्तर गोवा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी सोमवारी जारी केला आहे.
या प्रकरणी गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ५ सप्टेंबर २०१४ रोजी गुन्हा दाखल केला होता. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सूरज हळर्णकर यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन उपनिरीक्षक थेराॅन डिकोस्टा, दितेंद्र नाईक, उपनिरीक्षक दिनेश गडेकर, पोलीस काॅन्स्टेबल संदेश वळवईकर, रूपेश कांदोळकर, सुशांत पागी व इतर पथकाने गुप्तहेरांच्या माहितीवरून ५ सप्टेंबर २०१४ रोजी हणजूण येथील पंचायतीजवळ कारवाई करून आरोपी मन्डे फेलिक्स ओडेडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. त्यावेळी पथकाने त्याच्याकडून ७५ हजार रुपये किमतीचे ०.२५ ग्रॅम एलएसडी पेपर जप्त केले होते. त्यावेळी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक थेराॅन डिकोस्टा अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आरोपी विरोधात अमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ च्या कलम २२ (सी) अंतर्गत गुन्हा दाखल करून रीतसर अटक केली होती. त्यानंतर पथकाने आरोपीच्या विरोधात २५ फेब्रुवारी २०१५ रोजी वरील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर आरोपी मन्डे फेलिक्स ओडेडे याला न्यायालयाने २०१७ मध्ये सशर्त जामीन मंजूर केला. त्यानंतर या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला शुक्रवार १७ रोजी दोषी ठरविले तसेच त्याला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठविले होते. त्यानंतर सोमवार २० रोजी न्यायालयाने आरोपी मन्डे फेलिक्स ओडेडे याला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पाच वर्षांची सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी पथकातर्फे सरकारी वकील अना मेन्डोसा यांनी बाजू मांडली आहे.
दरम्यान, संशयित जामिनावर असताना त्याने आणखीन गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे.