सुपरकिंग्स रोखणार इंडियन्सचा विजयी रथ?

आयपीएलचे दुसरे पर्व आजपासून सुरू : मुंबई 'हॅटट्रिक'साठी उतरणार मैदानात


18th September 2021, 11:21 pm
सुपरकिंग्स रोखणार इंडियन्सचा विजयी रथ?

दुबई : आयपीएल २०२१‍च्या दुसऱ्या राऊंडला रविवार १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला मुकाबला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात होणार आहे. या मोसमात गुण क्रमवारीमध्ये चेन्नईची टीम ७ पैकी ५ सामन्यांमध्ये विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मुंबईने ७ पैकी ४ सामने जिंकले आहेत. रोहित शर्माची टीम ८ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईने २०१९ आणि २०२० साली आयपीएल ट्रॉफी जिंकली, त्यामुळे विजयाची हॅट्रिक करण्यासाठी मुंबईची टीम मैदानात उतरेल. तर दुसरीकडे एमएस धोनीच्या चेन्नईला रोहित शर्माचा विजयी रथ रोखण्याचे आव्हान असेल.
आयपीएल इतिहासात कोणत्याच टीमला लागोपाठ ३ आयपीएल ट्रॉफी जिंकता आल्या नाहीत, त्यामुळे रोहित शर्माची मुंबई इंडियन्स नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज आहे. सर्वाधिक ५ वेळा आयपीएल जिंकण्याचा विक्रमही मुंबई इंडियन्सच्याच नावावर आहे. दुसरीकडे चेन्नईची टीम तीन वेळा आयपीएल चॅम्पियन झाली आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात चेन्नईची कामगिरी निराशाजनक झाली. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला प्ले-ऑफमध्ये स्थान पटकावण्यात अपयश आले होते.
मुंबईने केला चेन्नईचा पराभव
गुणतक्त्यात चेन्नई मुंबईच्या पुढे असली तरी या मोसमात आधीच्या सामन्यात मुंबईने चेन्नईचा पराभव केला होता. १ मे रोजी दिल्लीत झालेल्या सामन्यात मुंबईचा ४ विकेटने रोमांचक विजय झाला होता. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत २१८/४ एवढ्या धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग मुंबईने अखेरच्या बॉलवर ६ विकेट गमावून केला. पोलार्डने ३४ चेंडूमध्ये नाबाद ८४ धावा केल्या होत्या. दुबईमध्ये होणाऱ्या या दुसऱ्या सामन्यात पुन्हा मोठा स्कोअर बघायला मिळू शकतो.
डुप्लेसिस-रोहित टॉपवर
चेन्नईकडून या मोसमात सर्वाधिक धावा फाफ डुप्लेसिसने केल्या आहेत. ७ सामन्यांमध्ये ६४च्या सरासरीने त्याने ३२० धावा केल्या यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे, तसेच त्याचा स्ट्राईक रेटही १४५ चा आहे. तर मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक २५० धावा केल्या आणि एक अर्धशतक झळकावले. रोहितचा स्ट्राईक रेटही १२८चा आहे. आयपीएलचा पहिला राऊंड भारतात झाला होता, तेव्हा कोणत्याच टीमना घरच्या मैदानात खेळता आले नव्हते. मुंबईला चेन्नईमध्ये ५ सामने खेळावे लागले होते. चेन्नईची खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्यामुळे मुंबईचे फलंदाज संघर्ष करत होते.
राहुल चहर मुंबईचा यशस्वी गोलंदाज
गोलंदाजीमध्ये राहुल चहर मुंबईचा सगळ्यात यशस्वी गोलंदाज ठरला. या लेग स्पिनर गोलंदाजाने ७ सामन्यांमध्ये १८च्या सरासरीने ११ बळी घेतले आहेत. त्याचा इकोनॉमी रेटही ७.२१ एवढा होता. २७ धावा देऊन ४ गडी बाद केल्याची त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. या प्रदर्शनामुळेच राहुल चहरची टी-२० वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. दुसरीकडे चेन्नईकडून वेगवान गोलंदाज सॅम करनने सर्वाधिक ९ गडी बाद केले आहेत.

बुमराह १०० वा सामना खेळणार
जसप्रीत बुमराहने सीएसकेविरुद्ध खेळण्यासाठी मैदानावर उतरेल, तेव्हा त्याचा हा १०० वा आयपीएल सामना असेल. बुमराहने २०१३ मध्ये आयपीएमध्ये पदार्पण केले, तेव्हापासून तो मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. आयपीएलच्या इतिहासात १०० व त्यापेक्षा अधिक सामने खेळणारा बुमराह हा ४५ वा खेळाडू ठरेल.

मुंबई आणि चेन्नई यांच्यात आतापर्यंत ३१ सामने झाले, त्यातील १९ सामन्यांत मुंबईचा तर १२ समान्यांमध्ये चेन्नईचा विजय झाला. मागच्या मोसमात दोन्ही टीमनी एक-एक सामना जिंकला. तर २०१९ साली चारही सामन्यांमध्ये मुंबईचा विजय झाला होता.

रोहितला ५,५०० धावांसाठी २० धावांची गरज‍
पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलमध्ये ५,५०० धावा पूर्ण करण्यापासून फक्त २० धावा दूर आहे. रोहितने आतापर्यंत २०७ आयपीएल सामन्यांमध्ये ५,४८० धावा केल्या आहेत. या टी-२० लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो चौथा फलंदाज आहे. त्याच्या नावावर एक शतक आणि ४० अर्धशतके आहेत.

जडेजा षटकारांच्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात दोन षटकार मारताच चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आयपीएलमध्ये सीएसकेसाठी ५० षटकार पूर्ण होणार आहेत. आयपीएलमध्ये सीएसकेसाठी अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरणार आहे. यापूर्वी एमएस धोनी, सुरेश रैना, मुरली विजय आणि अंबाती रायडू यांनी ही कामगिरी केली आहे.

हार्दिक षटकारांच्या शतकापासून ५ षटकार दूर
मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू हार्दिक पंड्या आयपीएलमधील षटकारांच्या शतकापासून फक्त ५ षटकार दूर आहे. पांड्याने आतापर्यंत ८७ सामन्यांत १४०१ धावा केल्या आहेत ज्यात त्याच्या ९५ षटकारांचा समावेश आहे. हार्दिकच्या नावावर ४ अर्धशतके आहेत. त्याने ९१ चौकारही मारले आहेत.

कृणाल पंड्याही विक्रमवीरांच्या यादीत
मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू कृणाल पंड्या चेन्नईविरुद्ध विकेट घेताच मुंबई इंडियन्ससाठी ५० विकेट पूर्ण करेल. यासह, कृणाल किरॉन पोलार्ड नंतर मुंबई इंडियन्ससाठी ५० विकेट आणि १००० धावा करणारा दुसरा खेळाडू बनेल.

आजचा सामना
संघ : चेन्नई सुपरकिंग्स वि. मुंबई इंडियन्स
स्थळ : इंटरनॅशनल स्टेडियम, दुबई
वेळ : सायं. ७.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क