चोरीच्या उद्देशाने वृद्ध महिलेवर हल्ला करणाऱ्या संशयितास अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31st July 2021, 12:37 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता

म्हापसा ः तुवारवाडा चिखली कोलवाळ येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसून तेरेझा पॉल या ६७ वर्षीय वृद्ध महिलेवर हल्ला करून पसार झालेल्या दीपक ज्यो सोलेमान (३५, कान्सा थिवी व मूळ हुबळी कर्नाटक) यास पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत कोलवाळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना दि. २१ रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. फिर्यादी तेरेझा पॉल यांच्या घराची कौले काढून संशयित घरात शिरला. घरात कुणीतरी घुसल्याच्या आवाजाने पॉल यांना जाग आली.संशयित चोरट्यासोबत तिची झटापट झाली. यावेळी तिच्या तोंडावर संशयिताने बुक्का मारला व तिला धक्का देत जमिनीवर पाडले. यात फिर्यादीच्या हाताला जखम झाली. त्यानंतर संशयित घरातून पसार झाला. पॉल यांनी तक्रारीसोबत संशयिताचे वर्णन कथन केले होते. यानुसार चौकशी करून पोलिसांनी संशयितास शुक्रवारी दुपारी अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंदार परब करीत आहेत.