आजगावकरांनी गोवा माईल्स रद्द करावे!

अन्यथा परिणामांना सामोरे जावे : टॅक्सी व्यावसायिकांचा सोपटेंनाही इशारा


30th July 2021, 11:46 pm
आजगावकरांनी गोवा माईल्स रद्द करावे!

मोरजी येथे टॅक्सी व्यावसायिकांच्या पत्रकार परिषदेत मंत्री बाबू आजगावकर व दयानंद सोपटे यांचा निषेध करताना व्यावसायिक बाप्पा कोरगावकर, प्रकाश पुर्खे, संजय कोले, बेबलो सिमोईस व इतर. (निवृत्ती शिरोडकर)

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पेडणे : गोमंतकीयांच्या हातात असलेला एकमेव टॅक्सी व्यवसाय आता सरकार हिसकावून घेऊन तो बिगर गोमंतकियांच्या हातात देवू पाहत आहे. याविषयी पर्यटनमंत्री बाबू आजगावकर विधानसभेत छातीठोकपणे गोवा माईल्स आपण आणल्याचे जाहीरपणे सांगत आहेत. आता त्यांनी व पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन तथा मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी सदर अॅप रद्द करावा. अन्यथा दोन्ही आमदारांना घरी पाठविण्यासाठी आम्हाला वेळ लागणार नाही, असा इशारा देत दोघाही लोकप्रतिनिधींचा टॅक्सी व्यावसायिकांनी निषेध केला.
यासंदर्भात पेडणे व बार्देश टॅक्सी व्यावसायिकांनी शुक्रवारी खिंड मोरजी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. यावेळी टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी बाप्पा कोरगावकर, योगेश गोवेकर, संजय कोले, प्रकाश पुर्खे, बेबलो सिमोईस आदींनी पर्यटनमंत्री आजगावकर आणि आमदार सोपटे यांच्यावर खरमरीत टीका केली.
बाप्पा कोरगावकर म्हणाले, टॅक्सी व्यावसायिक प्रामाणिकपणे काम करतात. मात्र, मंत्री आजगावकर व्यावसायिकांवर आरोप करतात. सरकारने व्यावसायिकांवर लेखी १०० गुन्हे नोंद केलेले दाखवावेत. अन्यथा पर्यटनमंत्री किती प्रामाणिक आणि कसे कमिशन खातात याचा हिशोब जनतेकडे आहे. ज्या पेडणेकरांच्या मतावर ते निवडून आले तेच पेडणेकर त्यांना परत मडगावला पाठवायला उशीर करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पर्यटनमंत्री आजगावकर यांच्याकडे क्रीडा खाते आहे. त्यांनी या खात्यांतर्गत युवकांना विविध क्रीडा प्रशिक्षण देऊन खेळाडू तयार करायला हवे. आजगावकर आता केवळ कमिशन खाण्यासाठी श्यामा प्रसाद स्टेडियम खासगीरीत्या लीजवर देणार आहेत, असा दावाही कोरगावकर यांनी केला. सरकार आणि टॅक्सी व्यावसायिकांची तोडगा काढण्यासाठी आजपर्यंत एकदाही बैठक झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अनेक व्यावसाईकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत राज्य सरकारचा निषेध केला.