तेजपाल प्रकरणी सरकारच्या याचिकेवर १० रोजी सुनावणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th July 2021, 12:39 Hrs

पणजी : सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार प्रकरणात तेहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात राज्य सरकारने आव्हान दिलेल्या याचिकेत बाजू मांडण्यासाठी तेजपालतर्फे वरिष्ठ  वकील अमित देसाई यांनी मुदत मागितली आहे. याची दखल घेऊन  खंडपीठाने पुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी 

ठेवली आहे.   तेजपाल यांना २०१३ मधील सहकारी महिला पत्रकाराच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने २१ मे रोजी दोषमुक्त केले होते. या निवाड्याला राज्य सरकारने खंडपीठात आव्हान दिले आहे. याबाबतची सुनावणी गुरुवारी झाली असता, तेजपालतर्फे वरिष्ठ वकील अमित देसाई यांनी सरकारने दाखल केलेल्या सुधारित याचिकेत बाजू मांडण्यासाठी तसेच आपले सहकारी वकील यांना उपस्थित राहण्यास अडचण असल्यामुळे गुरुवारी युक्तिवाद करणे कठीण असल्याचे सांगून आणखीन वेळ मागितला. याची दखल घेत खंडपीठाने सुनावणी १० ऑगस्ट रोजी ठेवली आहे. गोव्यात झालेल्या ‘थिंकफेस्ट’वेळी तेजपाल यांच्यावर सहकारी महिलेवर हॉटेलच्या लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने २१ नोव्हेंबर २०१३ रोजी राष्ट्रीय वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन २२ नोव्हेंबर २०१३ रोजी तेजपाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.