बँक बुडाल्यास ९० दिवसांत भरपाई

- खास विधेयकाला केंद्राची मंजुरी : ठेवीदारांना दिलासा

Story: नवी दिल्ली : |
29th July 2021, 01:31 am
बँक बुडाल्यास ९० दिवसांत भरपाई

नवी दिल्ली : बँक बुडाल्यास आता ठेवींवरील विमा रक्कम प्राप्त करण्यासाठी खातेदारांना फार ताटकळावे लागणार काही. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरेंटी कॉर्पोरेशन अंतर्गत ठेवींवरील पाच लाखांपर्यंतची विमा भरपाई ९० दिवसांत खातेदाराला मिळणार आहे. विमा भरपाईची संपूर्ण प्रक्रिया जलद करणाऱ्या 'डीआयसीजीसी विधेयक-२०२१'ला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ज्यात विमा भरपाई रक्कम १ लाखावरून ५ लाख करण्यात आली आहे. याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. ठेवींवर सरकारकडून पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. मात्र, एखादी बँक बुडाल्यास खातेदाराला त्याची जमापुंजी परत मिळेपर्यंत बराच अवधी लागतो. त्यामुळे सामान्य खातेदारांची परवड होते. हा मुद्दा लक्षात घेत मंत्रिमंडळाने विमा भरपाई देण्याबाबतची प्रक्रिया जलद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय रिझर्व्ह बँकेने ज्या बँकावर निर्बंध लागू केले असतील, त्यांनाही लागू होईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
सीतारामन म्हणाल्या,
* कोणतीही बँक दिवाळखोरीत निघाल्यास किंवा त्याचा परवाना रद्द झाल्यास, रिझर्व्ह बँकेने निर्बंध लागू केल्यास ठेवीदारांना ९० दिवसांत त्यांच्या ठेवीवरील विमा भरपाई मिळणार आहे.
* एखादी बँक अशा संकटात सापडली तर सुरुवातीच्या ४५ दिवसांत खातेदार, ठेवीदारांची माहिती गोळा केली जाईल. त्यानंतर ज्यांचे विमा दावे असतील, ते डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरेंटी कॉर्पोरेशनकडे सोपवले जातील.
* पुढील ४५ दिवसांत ठेवीदारांना त्यांची रक्कम सुपूर्द केली जाईल.
...........................................
कुठल्या बँकांचा समावेश?
डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरेंटी कॉर्पोरेशनअंतर्गत सर्व वाणिज्य बँका, विदेशी बँका त्यांच्या भारतातील सर्व शाखा, स्मॉल फायनान्स बँका, को-ऑपरेटिव्ह बँका, पेमेंट बँका यांचा समावेश आहे. 

हेही वाचा